ब्रेकिंग! रात्री उशिरापर्यंत कोरोना लस जिल्ह्यात दाखल होणार!!; आपल्या वाट्याला आली कोविशिल्ड लस

ऐतिहासिक कोरोना लसीकरणसाठी 7 केंद्र निर्धारित बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ड्राय रन झाली, प्रत्यक्ष लसीकरणाचा मुहूर्त ठरला, पण जिल्ह्याला कोणती लस मिळणार याची उत्सुकता आरोग्य यंत्रणासह प्रशासकीय वर्तुळात कायमच होती. मात्र एरवी अपशकुनी मानल्या जाणार्या 13 च्या आकड्याने याचे उत्तर दिले! आज, 13 जानेवारीला रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याला कोविशिल्ड ही दर्जेदार लस …
 

ऐतिहासिक कोरोना लसीकरणसाठी 7 केंद्र निर्धारित

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ड्राय रन झाली, प्रत्यक्ष लसीकरणाचा मुहूर्त ठरला, पण जिल्ह्याला कोणती लस मिळणार याची उत्सुकता आरोग्य यंत्रणासह प्रशासकीय वर्तुळात कायमच होती. मात्र एरवी अपशकुनी मानल्या जाणार्‍या 13 च्या आकड्याने याचे उत्तर दिले! आज, 13 जानेवारीला रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याला कोविशिल्ड ही दर्जेदार लस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

8 तारखेला जिल्ह्यातील 4 केंद्रांवर पार पडलेली ड्राय रन अर्थात रंगीत तालीम कमालीची यशस्वी ठरल्याने आरोग्य यंत्रणांच्या कामगिरीला लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनासह जाणकार नागरिकांच्याही टाळ्या मिळाल्या! यानंतर प्रत्यक्ष लसीकरणच्या मुहूर्ताच्या विविध शक्यता वर्तविण्यात आल्या. मात्र केंद्र सरकारने अचानक 16 जानेवारीचा मुहूर्त जाहीर करून टाकला. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा तयार असल्याने तात्काळ लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. मात्र लस नेमकी कोणती याची उत्सुकता वाढत आज दिवसभर शिगेला पोहोचल्याचे चित्र आरोग्य वर्तुळात दिसून आले. या उत्सुकतेवर आज 13 ला संध्याकाळी पडदा पडला! जिल्ह्याला सिरम निर्मित कोविशिल्ड ही लस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. वॅक्सिन रनची जवाबदारी सांभाळणार्‍या अधिकार्‍यांनी बुलडाणा लाईव्ह शी बोलताना याला पुष्टी दिली. पहिल्या टप्प्यासाठी 7 केंद्र निर्धारित करण्यात आली. यात बुलडाणा जिल्हा रुग्णालय, मलकापूर ,शेगाव, खामगाव सामान्य रुग्णालय आणि देऊळगाव राजा, चिखली, मेहकर ग्रामीण रुग्णालयात ही केंद्र राहणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. या ठिकाणी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एका केंद्रावर 75 ते 100 आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे.