ब्रेकिंग! 20 सप्टेंबरच्या मुहूर्तावर ठरणार डोणगावचा “कारभारी’!! न्यायालयाचा स्टे उठला; सरपंचपदानिमित्त दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; 5 सदस्यांत काट्याची चुरस

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहर असो वा विधानसभा राजकारण कायम तापलेलेलेच राहणार हा अलिखित नियमच होय! याला मग डोणगाव ग्रामपंचायत तरी कशी अपवाद राहणार? यामुळेच या ना त्या कारणामुळे सतत गाजत राहणाऱ्या डोणगाव ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक अर्थात सरपंच निवडणुकीच्या तब्बल 9 महिन्यानंतर ठरणार असून, आता त्यासाठी 20 सप्टेंबरचा मुहूर्त मुक्ररर …
 
ब्रेकिंग! 20 सप्टेंबरच्या मुहूर्तावर ठरणार डोणगावचा “कारभारी’!! न्यायालयाचा स्टे उठला; सरपंचपदानिमित्त दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; 5 सदस्यांत काट्याची चुरस

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहर असो वा विधानसभा राजकारण कायम तापलेलेलेच राहणार हा अलिखित नियमच होय! याला मग डोणगाव ग्रामपंचायत तरी कशी अपवाद राहणार? यामुळेच या ना त्या कारणामुळे सतत गाजत राहणाऱ्या डोणगाव ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक अर्थात सरपंच निवडणुकीच्या तब्बल 9 महिन्यानंतर ठरणार असून, आता त्यासाठी 20 सप्टेंबरचा मुहूर्त मुक्ररर करण्यात आलाय! या निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील 2 दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून, 5 सदस्यांत काट्याची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींत डोणगावचा समावेश असून, याची सदस्यसंख्या 17 इतकी आहे. मागील जानेवारी 2021 मध्ये येथील निवडणूक (अर्थात अत्यंत चुरशीत) पार पडली. याचबरोबर झालेल्या जिल्ह्यातील इतर शेकडो गावांचे सरपंच आणि उपसरपंच 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान निवडले गेले. आता 8 महिने उलटल्याने जुने पण झाले! मात्र डोणगावचा सरपंच आणि उपसरपंच अजूनही ठरायचे हाय !! याचे कारण नामांकन पत्रावरून उच्च न्यायालयात रिट दाखल झाल्याने निवडीला स्टे मिळाला. नुकताच तो उठल्याने निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला. आता सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीचा मुहूर्त जाहीर झाला आहे. येत्या 20 तारखेला होणाऱ्या या लढतीत सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी असे आहे. प्राप्त माहितीनुसार 17 पैकी 5 सदस्य इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याने या पांडवांपैकी कुणाची सिंहासनावर वर्णी लागते याकडे केवळ गावच नव्हे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. यामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे.

भाऊ की साहेब?
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढल्याने खासदार प्रतापराव जाधव व विद्यमान पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या टोकाचे राजकीय वितुष्ट व कटुता निर्माण झाली आहे. दोघांनी व दोघांच्या प्रचारकांनी प्रचारात एकमेकांचे खालच्या पातळीवर जाऊन वाभाडे काढले. याचे प्रतिबिंब नंतरच्या लहानमोठ्या निवडणुकांत उमटले. स्थानिक राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 सदस्यांमध्ये शिंगणे गटाचे 8 तर जाधव गटाचे 9 सदस्य आहेत. यामुळे या लढतीनिमित्त या 2 दिग्गज नेत्यांसह स्थानिक नेते व समर्थक सदस्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे अंतिम बाजी कोण मारते हे पाहणे मोठे रंजक ठरले आहे. लढाईचा मुहूर्त पाहता फोडाफोडी वा तीर्थयात्राचा फॉर्म्युला वापरला जाण्याची दाट शक्यता आहे.