भरधाव कारचालकाने वृद्धाला चिरडून 2 पोलीस, 2 पादचाऱ्यांना उडवले!; नागरिकांनी कारमधून खेचून बेदम चोपले!!; बुलडाणा शहरातील खळबळजनक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने लागोपाठ 5 जणांना उडवले. यात ड्युटीवरील 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. प्रसंगावधान राखून पोलीस आणि 2 पादचाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवला. मात्र 60 वर्षीय वृद्ध या कारच्या जबर धडकेने जागीच ठार झाला आहे. या थरारक घटनेनंतर जीव धोक्यात घालून शहर पोलिस व नागरिकांनी या कारचालकाला ताब्यात घेतले तेव्हा तो …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने लागोपाठ 5 जणांना उडवले. यात ड्युटीवरील 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. प्रसंगावधान राखून पोलीस आणि 2 पादचाऱ्यांनी स्‍वतःचा जीव वाचवला. मात्र 60 वर्षीय वृद्ध या कारच्‍या जबर धडकेने जागीच ठार झाला आहे. या थरारक घटनेनंतर जीव धोक्‍यात घालून शहर पोलिस व नागरिकांनी या कारचालकाला ताब्‍यात घेतले तेव्‍हा तो दारूच्‍या नशेत तर्रर्र होता. विशेष म्‍हणजे 4 जणांच्‍या जिवावर बेतणाऱ्या आणि एकाचा जीव घेणाऱ्या या कारचालकाच्‍या नातेवाइकांनी पोलिसांवरच मारहाणीचे आरोप करायला सुरुवात केली. ही घटना आज, 9 मे रोजी दुपारी साडेचारच्‍या सुमारास चिखली रोडवरील बुलडाणा शहर पोलीस ठाण्यासमोर घडली.

कारने चिरडून टाकलेल्या वृद्धाचे नाव मधुकर शंकर जाधव (60, रा. शांतीनिकेतन नगर, सुंदरखेड परिसर बुलडाणा) असे आहे, तर महिला पोलीस कर्मचारी योगिता शेळके, पोलीस कर्मचारी अमोल खराडे आणि 2 पादचारी जखमी झाले. जयस्‍तंभ चौकातून भरधाव आलेल्या कारने (क्रमांक एमएच 28 एजे 2632) मधुकर जाधव यांना उडवले. ते पाहून शहर पोलीस ठाण्यासमोर कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनी या कारला अडविण्याचा प्रयत्‍न केला. कारचालकाने या पोलिसांच्‍या अंगावरच कार घालण्याचा प्रयत्‍न केला. यात योगिता शेळके आणि अमोल खराडे हे पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले, मात्र जखमी झाले आहेत. त्‍यानंतर कारचालकाने तिथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना उडवले. यात तेही जखमी झाले.

पोलिसांनी आणि आजूबाजूच्‍या नागरिकांनी जीव धोक्‍यात घालून कारला रोखले. अन्यथा पुढेही अनेकांचे प्राण धोक्‍यात आले असते. संतप्‍त नागरिकांनी चालक शशिकांत अशोक गवई (रा. सुंदरखेड) या तरुणाला कारमधून बाहेर काढले. तो दारूच्‍या नशेत तर्रर्र असल्याचे पाहून नागरिकांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्‍यामुळे पोलिसांनी धावून त्‍याला नागरिकांच्‍या तावडीतून सोडवत पोलीस ठाण्यात नेऊन बसवले. नागरिक पांगल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्‍णालयात नेले. वृत्त लिहीपर्यंत कारचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला नव्‍हता.

उलटा चोर कोतवाल को डांटे…

संतप्‍त नागरिक कारचालक शशिकांतला बेदम मारहाण करत असताना त्‍यांच्‍या ताब्‍यातून सोडवून पोलिसांनी शशिकांतला पोलीस ठाण्यात नेऊन बसवले. त्‍यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेले. असे असतानाही त्‍याच्‍या नातेवाइकांनी पोलिसांवरच मारहाणीचे आरोप केले आहेत. तूर्त या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.