भर रस्‍त्‍यावर त्‍यांचा सुरू होता खुनी खेळ!; पाऊण तास ट्रॅफिक जॅम; कुणाची समोर येऊन रोखायची हिंमत होईना! देऊळगाव राजा तालुक्‍यातील ‘थरार’

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्थळ : सावखेड नागरे ते अंढेरा मार्ग, वेळ : 1 एप्रिलच्या दुपारी दीडची… रणरणत्या उन्हात सुरू असलेली वाहतूक अचानक जागीच स्टॉप. एसटी बससह लहान मोठी वाहने, प्रवासी जागीच खिळून जातात. सर्वांच्या नजर काही फुटांच्या अंतरावर सुरू असलेल्या दोघांवर खिळलेल्या…. समोर भर रस्त्यावर दोघा कट्टर दुष्मनांमध्ये प्राणांतिक फायटिंग …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : स्थळ : सावखेड नागरे ते अंढेरा मार्ग, वेळ : 1 एप्रिलच्या दुपारी दीडची… रणरणत्या उन्हात सुरू असलेली वाहतूक अचानक जागीच स्टॉप. एसटी बससह लहान मोठी वाहने, प्रवासी जागीच खिळून जातात. सर्वांच्या नजर काही फुटांच्या अंतरावर सुरू असलेल्या दोघांवर खिळलेल्या….

समोर भर रस्त्यावर दोघा कट्टर दुष्मनांमध्ये प्राणांतिक फायटिंग जुंपलेली असते. एकमेकांवर दोघेही तुटून पडत आपापल्या शस्त्रांनी एकमेकांवर जीवघेणे वारावर वार करत राहतात. तसे दोघे आकारमानाने एकदम विरुद्ध. जहरी वृत्तीचा तो एकदम सहाक फुटाचा तर दुसरा ठेंगणा. ही आरपारची लढाई आता टोकाची झालेली. कुणातरी एकाचा मर्डर नक्की… अशा पोझिशनला पोहोचलेली!, ते आता रस्त्याच्या मध्यभागी येऊन पुन्हा भिडतात…

तोपावेतो दोघे रक्तबंबाळ झालेले, थकलेले… पण आज दुष्मनाला सोडायचेच नाय ही खुनशी जिद्द त्यांना थांबू देत नाही. ठेंगना जीव मात्र चपळाईने ब्रेक घेत काही क्षण बाजूच्या शेतात जाऊन काहीतरी हुंगून पुन्हा रस्त्यावर येतो. त्याचीच वाट पाहत उभा असलेला सहाफुट्या व ठेंगणा पुन्हा एकमेकांना भिडतात. ठेंगूचे टार्गेट असते दुष्मनाचे मुंडके! तो मार खात पुन्हा त्याच दिशेने झेपावत वार करतो, यात तो यशस्वी होतो. लढाई पुन्हा रस्त्याच्या कडेला सरकते. लंब्याचं मुंडके जायबंदी होते, छोट्या पुन्हा शेतात जातो अन्‌ झुडुपाच्या आडून हल्ले करू लागतो. यादरम्यान दोघेही गलीतगात्र होऊन निपचित पडून राहतात. अर्ध्या तासापासून खोळंबलेली पण लढाईत पडण्याची हिंमत न करणारी पब्लिक दोघांपैकी कोण मेले, मरू शकते यावर चर्चा करीत सावधानतेने स्पॉट सोडते… काही क्षणातच सर्व रस्ता सामसूम होतो. यामुळे अखेर कोण मेले याचा उलगडा होत नाही ,विशेष म्हणजे या दोघांच्या खुनी लढाईशी पोलीस दादानाही काहीच देणेघेणे नसते, याचे कारण म्हणजे… ती लढाई असते नैसर्गिक शत्रू असलेल्या नागराजा व मुंगूसची! या प्राणघातक पण अनिर्णित राड्याचा दी एन्ड काय याचा उलगडा कोणी साक्षीदार नसल्याने होत नाही. तेवढ्या वेळात एका मोबाईल प्रेमीने काढलेल्या व्हिडीओमध्येही हा एन्ड आला नाहीये… हा व्‍हिडिओ बुलडाणा लाइव्‍हकडे पाठवलाय आमचे मलकापूर पांग्राचे प्रतिनिधी अमोल साळवे यांनी.

पहा अशी झाली लढाई…