भाऊंच्‍या निधनाने बुलडाणा जिल्हा सुन्न!; शरद पवारांसह जिल्ह्यातील या नेत्‍यांनी व्‍यक्‍त केल्या संवेदना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानचे सर्वेसर्वा शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज, ४ ऑगस्टला सायंकाळी पाचला निधन झाले. निधनाची वार्ता कळताच अवघा जिल्हा सुन्न झाला आहे. सोशल मीडियापासून ते प्रत्यक्षातील भेटींतीही भाऊंच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.भाऊंनी अध्यात्मिकतेला …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावच्‍या श्री संत गजानन महाराज मंदिर संस्‍थानचे सर्वेसर्वा शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज, ४ ऑगस्‍टला सायंकाळी पाचला निधन झाले. निधनाची वार्ता कळताच अवघा जिल्हा सुन्‍न झाला आहे. सोशल मीडियापासून ते प्रत्‍यक्षातील भेटींतीही भाऊंच्‍या जाण्याबद्दल हळहळ व्‍यक्‍त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्‍यासह जिल्ह्यातील नेत्‍यांनीही शोकसंवेदना व्‍यक्‍त केल्या आहेत.
भाऊंनी अध्यात्मिकतेला समाजसेवेची जोड दिली : शरद पवार
आध्यात्मिकतेला समाजसेवेची जोड देत शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर चालवलेला सेवायज्ञ अनेकांसाठी आदर्शवत आहे. शिवशंकरभाऊंच्या स्पृहणीय व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण आदरांजली! श्री गजानन महाराज संस्थानाच्या जडणघडणीत देखील शिवशंकरभाऊंच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे व नियोजनाचे मोठे योगदान आहे. स्वच्छतेला धार्मिक अधिष्ठान देत आनंदसागर सारखं नंदनवन त्यांनी उभं केलं. सात्विकता, समर्पण आणि सेवाभावाने सामाजिक कार्याचा वसा अव्याहतपणे जपणारे निष्काम कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानाच्या माध्यमातून त्यांनी गरजू, विद्यार्थी, आदिवासी समाजासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले, अशा शोकसंवेदना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्‍यक्‍त केल्या.

व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो : देवेंद्र फडणवीस
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्‍दांत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊंना श्रद्धांजली वाहिली.

निस्पृह, निस्वार्थी सेवेचा वस्तूपाठ घालून देणारा कर्मयोद्धा हरवला : आमदार श्वेताताई महाले
निस्पृह व निस्वार्थी सेवेच्या माध्यमातून विदर्भ पंढरी संत गजानन महाराज संस्थानचे नाव साऱ्या जगात पोहोचविणारे कर्मयोद्धा व्यक्तिमत्त्व हरपला आहे. शेगाव संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यांच्या दुःखद निधनामुळे आपण एका सेवाव्रतीला मुकलो आहोत. जगभरातील देवस्थानच्या ठिकाणांपेक्षा संत गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून सेवा, स्वच्छता आणि अन्नदान करून एक वेगळी ओळख कर्मयोद्धा शिवशंकरभाऊ पाटील यांनी निर्माण केली होती. शेगाव संस्थान म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे शिवशंकर भाऊ अशी ख्याती सगळीकडे झालेली आहे. शिवशंकर भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शोकसंवेदना आमदार श्वेताताई महाले यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्‍यक्‍त केल्या.

मॅनेजमेंट गुरु हरपले ः आमदार संजय गायकवाड
संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या कल्पकतेतून मॅनेजमेंट कसे असते, याचे मूर्तीमंत उदाहरण शेगाव संस्थानच्या व्यवस्थापनातून दाखवून दिले. भाऊ विदर्भासोबतच बुलडाणा जिल्ह्याच्या आपण कायमच स्मरणात रहाल. ” ऐसे कर्मयोगी पुन्हा होणे नाही’, अशा शब्‍दांत आमदार संजय गायकवाड यांनी भाऊंना श्रद्धांजली वाहिली.

ऋषितूल्य, पूजनीय व्यक्तिमत्व हरवले : आमदार संजय कुटे
संत गजानन महाराज संस्थान शेगावचे विश्वस्त कर्मयोगी ऋषितुल्य आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाची वार्ता कळाली. दु:खद अशी घटना आहे. सेवाव्रती जीवन आज नेहमीकरिता गजाननाच्या चरणी विलीन झाले. आम्ही सर्व पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, असे शोकसंवेदना आमदार संजय कुटे यांनी व्‍यक्‍त केल्या.

भाऊंनी भक्तांत भगवान शोधला : खासदार प्रतापराव जाधव
भाऊंच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. निष्काम कर्मयोगी देशाने गमावला आहे. संपूर्ण हयातीत भाऊंनी भक्तांमध्ये भगवंत शोधला.जगाला हेवा वाटावा असे शिस्तबद्ध संस्थान भाऊंनी उभे केले. कामिका एकादशीच्या दिवशी भाऊंचे वैकुंठगमन म्हणजे एका कर्मयोगी व्यक्तिमत्वाचा भगवंताने केलेला सन्मानच आहे. भाऊंच्या निधनाने जिल्हा, राज्य, देशासह गजानन महाराज संस्थानचे न भरून येणारे मोठे नुकसान झाले. मी माझे मार्गदर्शक गमावले, अशा शब्‍दांत खासदार प्रतापराव जाधव यांनी भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली.

लाखो लोकांच्या आयुष्यातील आनंदसागर आज हरपला ः नाना पटोले
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे सर्वेसर्वा कर्मयोगी आदरणीय श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाल्याची माहिती दुःखदायक आहे. काँग्रेस व माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शोकसंवेदना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्‍यक्‍त केल्या.