भारीच! सरपंच गेले रजेवर, उपसरपंच बघणार “कारभार’!!; जिल्ह्यातील कदाचित पहिलीच घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कदाचित पहिल्यांदाच एक अनोखी राजकीय घटना घडली आहे. ही घटना मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथे समोर आली असून, सरपंच सुटीवर गेल्याने त्यांचा प्रभार उपसरपंचांकडे आला आहे. उपसरपंच असलेले भगवानराव उगले यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा हे गाव सुमारे …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कदाचित पहिल्यांदाच एक अनोखी राजकीय घटना घडली आहे. ही घटना मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथे समोर आली असून, सरपंच सुटीवर गेल्याने त्‍यांचा प्रभार उपसरपंचांकडे आला आहे. उपसरपंच असलेले भगवानराव उगले यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा हे गाव सुमारे आठ हजार लोकसंख्येचे आहे. या गावाची बाजारपेठ मोठी असून, येथील गुरांचा बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 13 आहे. गत्‌ सहा महिन्यांपूर्वीच निवडणुका झाल्या होत्या. सरपंच पद हे ओबीसी महिलेकरिता राखीव होते. भगवानराव उगले यांच्या पॅनलला निर्विवाद बहुमत मिळाल्याने सरपंचपद याच पॅनलच्या अनिता बंडू उगले यांच्‍याकडे आले. उपसरपंच म्हणून भगवानराव उगले यांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, सरपंच अनिता उगले यांनी सुटीचा अर्ज दिला. त्‍यामुळे त्‍यांचा कारभार उपसरपंचांकडे आला आहे.

आजवर सरपंचाची निवड न झाल्यामुळे, सरपंचपद रिक्त राहिल्यामुळे अथवा सरपंच पद काही कारणामुळे रद्द होऊन सरपंच पायउतार झाले तर पदभार उपसरपंचाकडे येतो. मात्र मलकापूर पांग्रा येथे जिल्ह्यात कदाचित प्रथमच सरपंच रजेवर गेल्याने त्यांचा पदभार उपसरपंचांकडे आला आहे. या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणावर घडत आहे. या घटनेची पुनरावृत्ती भविष्यात गाव खेड्याच्या राजकारणात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उपसरपंच भगवानराव उगले यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला असून ग्रामपंचायत स्तरावरील सर्व खातेबदल सह्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ग्रामसेवक उध्दव गायकवाड, पत्रकार भगवान साळवे यांनी सरपंच उगले यांचा सत्कार केला. यावेळी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच भगवान उगले यांनी केले आहे.