भीषण अपघात… भरधाव टिप्परने दुचाकीला उडवले; 2 ठार; अंचरवाडी फाट्याजवळील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार दोघे ठार झाले. हा भीषण अपघात काल, 1 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास चिखली-देऊळगाव रस्त्यावरील अंचरवाडी (ता. चिखली) फाट्याजवळ घडला. भगवान शेणफड परिहार (65) आणि गजाजन बबन शिंदे (35, दोघेही रा. अंचरवाडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. काल संध्याकाळी दोघेही चिखलीवरून अंचरवाडीकडे निघाले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्‍वार दोघे ठार झाले. हा भीषण अपघात काल, 1 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास चिखली-देऊळगाव रस्‍त्‍यावरील अंचरवाडी (ता. चिखली) फाट्याजवळ घडला. भगवान शेणफड परिहार (65) आणि गजाजन बबन शिंदे (35, दोघेही रा. अंचरवाडी) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत.

काल संध्याकाळी दोघेही चिखलीवरून अंचरवाडीकडे निघाले होते.गजानन शिंदे हे दुचाकी चालवत होते. अंचरवाडी फाट्याजवळ गावाकडे जाण्यासाठी गाडी वळवताना देऊळगाव राजाकडून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की भगवान परिहार यांचा जागीच मृत्यू झाला तर गजानन शिंदे यांचा उपचारादरम्यान चिखली येथे मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत असलेले टिप्पर घटनास्थळवरून पसार झाले.

टिप्परच्या वेगावर नियंत्रण आवश्यक
चिखली- देऊळगाव राजा रस्त्याने टिप्पर सुसाट धावत असतात. टिप्परचालक दुसऱ्यांच्या जिवाची काळजी करीत नाहीत. भरधाव टिप्पर दिवस- रात्र धावत असतात. यापूर्वी सुद्धा या रस्त्यावर टिप्पर अनेक अपघातास कारणीभूत ठरले आहेत. टिप्पर च्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.