भीषण अपघात : लग्‍नाचा बस्ता फाडण्यासाठी गेलेल्‍या कुटुंबावर काळाचा आघात; कार कंटेनरवर आदळून वडील-मुलगी जागीच ठार; शेंदुर्जन येथील शिंगणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलीच्या लग्नासाठी अमरावती येथून बस्ता फाडून परतणाऱ्या शेंदुर्जन (ता. सिंदखेड राजा) येथील शिंगणे कुटुंबियांवर काळाने मोठा आघात केला. कारला कंटेनर आडवा आल्याने झालेल्या अपघात वडील आणि मुलगी जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात डोणगाव- मालेगाव रोडवरील वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत काल, 27 मार्चच्या रात्री 11 च्या सुमारास …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुलीच्या लग्नासाठी अमरावती येथून बस्ता फाडून परतणाऱ्या शेंदुर्जन (ता. सिंदखेड राजा) येथील शिंगणे कुटुंबियांवर काळाने मोठा आघात केला. कारला कंटेनर आडवा आल्याने झालेल्या अपघात वडील आणि मुलगी जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात डोणगाव- मालेगाव रोडवरील वाशिम जिल्ह्याच्‍या हद्दीत काल, 27 मार्चच्‍या रात्री 11 च्या सुमारास घडला. डॉ. दिनकर शिंगणे (47,, कल्याणी दिनकर शिंगणे (19) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

शेंदुर्जन येथील अशोक जनार्धन शिंगणे यांची मुलगी सुकन्याचा विवाह 6 मे रोजी ठरला होता. दरम्यान, लग्नाचा बस्ता फाडण्यासाठी शिंगणे कुटुंबीय कारने अमरावतीला गेले होते. वाहनात मुलीचे वडील अशोक शिंगणे, मुलगी सुकन्या अशोक शिंगणे, भाऊ धनंजय अशोक शिंगणे, चुलतभाऊ ज्ञानेश्वर शिंगणे, डॉ. दिनकर शिंगणे, कल्याणी शिंगणे व चालक बबन इघारे असे 7 जण होते. दरम्यान मालेगाव- डोणगाव रोडवर शिरपूर जैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारला कंटेनर आडवा आला. त्‍यामुळे कार कंटेनरवर आदळली. यात डॉ. दिनकर शिंगणे व त्यांची मुलगी कल्याणी शिंगणे जागीच ठार झाले.उर्वरित 5 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले. एकाच परिवारातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने व बाकीचे जखमी झाल्याने शेंदुर्जन गावावर शोककळा पसरली आहे.