मध्यरात्री गाय घेऊन निघाले होते… संशयावरून अडवले म्‍हणून फुटले बिंग!; बजरंग दलाची कामगिरी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील पशुधन चोरणाऱ्या टोळीतील दोघांना नागरिकांनी पकडून सोनाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. तालुक्यातील टुनकी येथील शेतकरी दिनकर त्र्यंबक चोरे यांचे लाडनापूर शिवारातील शेतात जनावरांसाठी गोठा आहे. गोठ्यातून मध्यरात्री 1 च्या सुमारास दोघे जण गाय चोरून जळगाव जामोदकडे नेताना शेतखेड व करमोडा येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते ईश्वर गावंडे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील पशुधन चोरणाऱ्या टोळीतील दोघांना नागरिकांनी पकडून सोनाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.

तालुक्यातील टुनकी येथील शेतकरी दिनकर त्र्यंबक चोरे यांचे लाडनापूर शिवारातील शेतात जनावरांसाठी गोठा आहे. गोठ्यातून मध्यरात्री 1 च्‍या सुमारास दोघे जण गाय चोरून जळगाव जामोदकडे नेताना शेतखेड व करमोडा येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते ईश्वर गावंडे व शिवा जामोदकर यांच्‍या निदर्शनास आले. त्‍यांनी दोघांना थांबवून विचारणा केली असता आम्ही ही गाय नातेवाईकांच्या घरी नेत आहोत, अशी उडवाउडवीची उत्तरे त्‍यांनी दिली. चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्‍न केला असता दोघांना पकडून ठेवले. बजरंग दल तालुका संयोजक भारत बावस्कार यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्‍यावरून तालुका गौरक्षा प्रमुख सागर वावरे हे सोनाळा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी आले. दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. शेतकरी दिनकर त्र्यंबक चोरे यांनी या प्रकरणात पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. त्‍यावरून मनोहर सोनवणे, सिद्धार्थ खगे यांच्याविरुद्ध पशुधन चोरण्याचा प्रयत्‍न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास बीट जमादार सैय्यद मोईन करत आहेत.