मध केंद्र योजनेत पात्र व्यक्ती, संस्थांकडून मागवले अर्ज; 28 जुलैपर्यंत मुदत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रशिक्षणासाठी व उद्योगासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. योजनेतंर्गत वैयक्तिक मधपाळांसाठी प्रशिक्षण जिल्ह्यात कुठेही मिळणार आहे. पात्र अर्जदारांना 10 मधपेट्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जदार हा साक्षर असावा. तसेच त्याच्याकडे स्वत:ची शेती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रशिक्षणासाठी व उद्योगासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.

योजनेतंर्गत वैयक्तिक मधपाळांसाठी प्रशिक्षण जिल्ह्यात कुठेही मिळणार आहे. पात्र अर्जदारांना 10 मधपेट्या देण्यात येणार आहेत. त्‍यासाठी अर्जदार हा साक्षर असावा. तसेच त्याच्याकडे स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक मंडळाकडे करावी लागेल. प्रगतशील मधपाळांसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर (जि. सातारा) येथे मिळणार आहे. तसेच 50 मधपेट्या देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असावा व वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या नावे किंवा कुटूंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन व प्रजनन, मधोत्पादन याबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केंद्र चालक संस्थेसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर (जि. सातारा) येथे मिळणार आहे. तसेच 50 मधपेट्या मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संस्था ही नोंदणीकृत असावी, संस्थेचे नावे मालकीची किंवा 10 वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतलेली किमान एक एकर शेती किंवा 1000 चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मधोत्पादनाकरीता लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध उद्योग व्यवसाय सुरू करणे बाबत मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, शेतीचा 7/12 व नमुना 8 – अ, दोन छायाचित्रे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 जुलै 2021 आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अरूणोदय बिल्डींग, सुवर्णनगर, बुलडाणा या कार्यालयाशी तसेच 07262-22428667, 8329908470 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.