मराठ्यांच्या वंशामधी देवधर्म जागोजागी… गावोगावी गुंजू लागले वासुदेवांचे स्वर… लोककलाही झाली अनलॉक!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरत्या वर्षात दिवाळीच्या मुहूर्तावर लॉकडाऊनमधून एकेका क्षेत्राची सुटका झाली. बंधने शिथिल झाली आणि बंदिस्त असलेली लोककला व कलावंत बंधनमुक्त झाले. यामुळे आता गावखेड्यासह शहरातही वासुदेवा सारख्या लोककलावंताचे स्वर, देवधर्माचा जयघोष पुन्हा आसमंतात गुंजू लागलाय! जुन्या पिढीमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर अन् मोबाइलमध्ये बंदिस्त बालक व युवकांना त्यांच्याप्रती उत्सुकता असल्याचे …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरत्या वर्षात दिवाळीच्या मुहूर्तावर लॉकडाऊनमधून एकेका क्षेत्राची सुटका झाली. बंधने शिथिल झाली आणि बंदिस्त असलेली लोककला व कलावंत बंधनमुक्त झाले. यामुळे आता गावखेड्यासह शहरातही वासुदेवा सारख्या लोककलावंताचे स्वर, देवधर्माचा जयघोष पुन्हा आसमंतात गुंजू लागलाय! जुन्या पिढीमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर अन् मोबाइलमध्ये बंदिस्त बालक व युवकांना त्यांच्याप्रती उत्सुकता असल्याचे चित्र दिसून येत आहे.


सरत्या वर्षभरात ठाण मांडून बसणार्‍या कोरोनारुपी राक्षसामुळे भक्तगण भयभीत झाले. देवाचा जप, जयघोष करत लोक कला जिवंत ठेवणारे वासुदेव, शाहीर, वाघ्या मुरळी, भोपे, पोतराज आदी लोक कलावंत भूमिगत झाले. स्वतःसह कलेला कोंडून घरात बसले. सर्वच व्यवहार, समारंभ, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने लोककला बंदिस्त झाली. कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. या प्रतिकूल पार्श्‍वभूमीवर आता लोककला, कलाकार मोकळे झाले असून त्यांचे स्वर, नाद आसमंतात गुंजू लागले आहेत. गावोगावी देव धर्म, संस्कृती यावर जागृती करणारे वासुदेव सहसा एकट्यानेच हे कर्तव्य पार पाडतात. आताशा अनेक जण शहरात स्थिरावल्याने नागरी भागातही भटकंती करत कलासाधना करतात. मूळचे देउळघाटकर  व सध्या बुलडाण्यात स्थायिक गणेश राधाकिशन यदमाळ हे त्याचे उदाहरण होय. त्यामुळे टाळच्या मंजूळ निनादात ते पारंपरिक गीते, तुकोबांचे अभंग सादर करतात. पूर्वाश्रमीच्या गावाच्या पाटलांची उदारता, देवधर्माला त्यांनी केलेली मदत याचे वर्णन मराठ्यांच्या वंशामधी देवधर्म जागोजागी या गीतातून  ते मांडतात. तसेच पंढरीच्या रायाला साखरझोपेतून उठविण्याची ते अभंगातून विनवणी करतात. उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा, गाव जाग झालं सारं, आता उजळले उजळले, घरोघरी सुवासिनी सडे टाकतो, काढतात मुलीबाळी अंगणी रांगोळी… या गाण्यांनी परिसर पवित्र झाल्याचा भास होतो. तसेच तुका म्हणे आहे भाव, पीठे नांदे,वासुदेव गाती तुकाचे अभंग… यामुळे ऐकणार्‍याचे कान तृप्त होतात. डाळ धान्य जे मिळाले ते झोळीत घेत ,सर्वांना आशीर्वाद देत पुढे जाणारी वासुदेवाची स्वारी  पुढच्या प्रवासाला निघते.