मलकापूर पांग्राचा पशुवैद्यकीय दवाखाना आठ दिवसांपासून बंद, शेतकऱ्यांचे हाल

मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आठ दिवसांपासून मलकापूर पांग्रा येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद आहे. खासगी डॉक्टरही उपलब्ध होत नसल्याने जनावरावर उपचार तरी कुठे करावेत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मलकापूर पांग्राच्या दवाखान्याला 12 गावे जोडलेली असून, डोरवी, खैरव, चांगेफळ, वाघाळा, देऊळगाव कोळ, कोनाटी, कुंबेफळ, आगेफळ ,वाघरूळ, वागद या …
 

मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आठ दिवसांपासून मलकापूर पांग्रा येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद आहे. खासगी डॉक्‍टरही उपलब्‍ध होत नसल्याने जनावरावर उपचार तरी कुठे करावेत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मलकापूर पांग्राच्‍या दवाखान्याला 12 गावे जोडलेली असून, डोरवी, खैरव, चांगेफळ, वाघाळा, देऊळगाव कोळ, कोनाटी, कुंबेफळ, आगेफळ ,वाघरूळ, वागद या गावांतील शेतकऱ्यांना आपले आजारी जनावर घेऊन याच दवाखान्यात यावे लागते. सात ते आठ किलोमीटरवरून जनावर घेऊन आल्यावर दवाखाना बंद दिसत असल्याने त्‍यांच्‍या संतापात भर पडत आहे. ५ मेपासून दवाखान्याला कुलूप लागलेले आहे. कोणालाच याविषयी माहिती नाही. डॉ. वानखेडे व परिचारक कैलास गणेशकर या ठिकाणी कार्यरत असतात. डॉक्‍टरांना कोरोना झाल्‍याने ते घरी असल्याचे सांगण्यात येते, तर परिचारक कैलास गणेशकर यांची ड्युटी मलकापूर पांग्रा गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात गटविकास अधिकाऱ्यांनी लावली आहे. त्‍यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना वार्‍यावर सोडल्‍याचे चित्र आहे. माणसाला उपचार मिळत आहेत, पण मुकी जनावरे वेदना सोसताना दिसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.