मलकापूर पांग्रा- दुसरबीड रस्त्याची चाळणी!; खड्ड्यांमुळे वाढले अपघात

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे छोटेमोठे अपघात वाढले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कै. विजय मखमले विद्यालयासमोरील पुलावर मोठा खड्डा पडला असून, येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना उतार असल्यामुळे तो …
 
मलकापूर पांग्रा- दुसरबीड रस्त्याची चाळणी!; खड्ड्यांमुळे वाढले अपघात

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे छोटेमोठे अपघात वाढले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्‍त्‍याची दुरुस्‍ती करावी, अशी मागणी होत आहे.

कै. विजय मखमले विद्यालयासमोरील पुलावर मोठा खड्डा पडला असून, येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना उतार असल्यामुळे तो दिसून येत नाही. त्यामुळे याठिकाणी रोज एकतरी अपघात घडत आहे .दुसरबीड फाटा ते वर्दडी फाटा दरम्यान असलेल्या रस्त्याची स्थिती खूपच वाईट आहे. रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे. रस्त्याच्या मधोमध एक ते दीड फूट खोल खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात रोज होत आहेत. रुग्णालयात रुग्ण नेताना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे लहान-मोठ्या वाहन चालक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रोड नागपूर- पुणे हायवेला जोडला जातो. तालुक्याचे ठिकाण सिंदखेड राजाला जाण्यासाठी हाच रस्ता वापरला जातो. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या रस्‍त्याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनधारक व गावकरी करत आहेत.

मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.

-बद्रीनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्य, मलकापूर पांग्रा

मलकापूर पांग्राकडून दुसरबीडकडे जाणाऱ्या पहिल्या पुलावर रात्री अपरात्री अपघात घडतात. एखाद्याला वेळेवर उपचार मिळाले नाही तर प्राणही जाऊ शकतो. तात्काळ संबंधित विभागाने लक्ष द्यावे.

– किरण काकडे, ग्रामपंचायत सदस्य, मलकापूर पांग्रा