महामार्गावरील खड्ड्याने घेतला सासूचा बळी!; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जावयासोबत दुचाकीवर बसून जाणार्या सासूचा रस्त्यावरील खड्ड्याने बळी घेतला आहे. तरोडा (ता. खामगाव) जवळ हा अपघात 6 डिसेंबरला दुपारी झाला होता. उपचारादरम्यान सासूचा काल, 6 जानेवारीला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मृत्यू झाला. सौ. सुमनबाई नारायण सदांशिव (55, रा. धरणगाव, ता. पातूर, जि. अकोला) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जावयासोबत दुचाकीवर बसून जाणार्‍या सासूचा रस्त्यावरील खड्ड्याने बळी घेतला आहे. तरोडा (ता. खामगाव) जवळ हा अपघात 6 डिसेंबरला दुपारी झाला होता. उपचारादरम्यान सासूचा काल, 6 जानेवारीला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मृत्यू झाला.

सौ. सुमनबाई नारायण सदांशिव (55, रा. धरणगाव, ता. पातूर, जि. अकोला) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुमनबाई या जावई विनोद भोजने यांच्यासोबत मोटारसायकलवर बसून वरूडला जात होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तरोडाजवळ अचानक मोठा खड्डा आल्याने जावयाने ब्रेक दाबले. त्यामुळे तोल जाऊन सुमनबाई पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान काल, 6 जानेवारीला सायंकाळी पावणेसातला त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळ खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ना. राजेश गाडेकर करत आहेत. आकस्मिक मृत्यूची नोंद पोहेकाँ आनंद वाघमारे यांनी करून घेतली.