महाविकास आघाडी सरकारने ‘ओबीसीं’च्या पाठीत खंजीर खुपसला; उद्या राज्यभर भाजप करणार आंदोलन : आमदार संजय कुटे यांची माहिती

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याआधीच राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या निवडणुका स्थगित करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारने संमती दर्शविली होती. मात्र निवडणुका घोषित करून आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया …
 
महाविकास आघाडी सरकारने ‘ओबीसीं’च्या पाठीत खंजीर खुपसला; उद्या राज्यभर भाजप करणार आंदोलन : आमदार संजय कुटे यांची माहिती

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याआधीच राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या निवडणुका स्थगित करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारने संमती दर्शविली होती. मात्र निवडणुका घोषित करून आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जळगाव जामोदचे आमदार, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी संजय कुटे यांनी दिली. आज, १४ सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्याचा निषेधार्थ उद्या १५ सप्टेंबर रोजी भाजपतर्फे राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ. कुटे यांनी दिली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर व मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. यावेळी आ. कुटे म्हणाले, की शिवसेनेला ओबीसींचे राजकीय आरक्षण हा विषय समजतच नाही. राष्ट्रवादी हा धनदांडग्यांचा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला विरोध आहे. काँग्रेस ओबीसी राजकीय आरक्षणाला समर्थन असल्याचे दाखवते; परंतु त्यांचे मंत्री गंभीर नाहीत.

काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर बनला आहे. तिन्ही पक्षांनी मिळूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविले असल्याचा आरोप आ. कुटे यांनी केला. मागासवर्गीय आयोग स्थापन करूनही अजून आयोगाला कार्यालय नाही. आयोगाला निधी सुद्धा देण्यात आला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यवाही करावी, असेही आमदार कुटे म्हणाले.