महावितरणचा असिस्‍टंट इंजिनिअर लाचेच्‍या जाळ्यात, देऊळगाव राजात कारवाई

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कामाच्या पूर्तता अहवालावर सही करण्यासाठी कंत्राटदाराकडून 1500 रुपयांची लाच घेताना वीज महावितरण कंपनीचा सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई आज, 15 मार्चला सायंकाळी महावितरणच्या देऊळगाव राजा उपविभागीय कार्यालयात करण्यात आली.योगेश उदयसिंह भोकन(28) असे या लाचखोर अभियंत्याचे नाव असून, तो सहायक अभियंता (वर्ग 2) या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कामाच्या पूर्तता अहवालावर सही करण्यासाठी कंत्राटदाराकडून 1500 रुपयांची लाच घेताना वीज महावितरण कंपनीचा सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या जाळ्यात अडकला. ही कारवाई आज, 15 मार्चला सायंकाळी महावितरणच्‍या देऊळगाव राजा उपविभागीय कार्यालयात करण्यात आली.
योगेश उदयसिंह भोकन(28) असे या लाचखोर अभियंत्याचे नाव असून, तो सहायक अभियंता (वर्ग 2) या पदावर कार्यरत आहे.तो मूळचा तरोडा (ता. मोताळा) येथील रहिवासी आहे. यासंदर्भात सोनोशी (ता. सिंदखेड राजा) येथील 49 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती. ते महावितरण कंपनीचे कंत्राटदार आहेत. त्यांना मुख्यमंत्री सौर पंप योजनेअंतर्गत केलेल्या कामाच्या पूर्तता अहवालावर या सहायक अभियंत्याची सही घ्यायची होती. त्यासाठी भोकन याने प्रतिअहवाल 500 रुपये याप्रमाणे 1500 रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री झाल्यानंतर सापळा रचला. भोकन याला 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई विशाल गायकवाड (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र), अरुण सावंत (अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाण्याचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी,पोलीस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, पोलीस शिपाई जगदीश पवार, चालक पोलीस शिपाई मधुकर रगड यांनी पार पाडली.

कुणी लाच मागत असल्यास…
कोणत्‍याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्‍यक्‍तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक: 8888768218