महावितरणच्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाढताहेत हल्ले; खामगाव तालुक्‍यातही आज विटांनी चढवला हल्ला!

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यात हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शेगाव तालुक्यातील गायगाव खुर्द, मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथेही आज, 13 मार्चला दुपारी एकच्या सुमारास महावितरणच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांवर तिघांनी हल्ला चढवला. या प्रकरणी कोलोरी वितरण केंद्राचे सहायक …
 

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वीज महावितरणच्‍या कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यात हल्ले होण्याच्‍या घटना वाढल्या आहेत. शेगाव तालुक्‍यातील गायगाव खुर्द, मलकापूर तालुक्‍यातील नरवेल येथे वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना खामगाव तालुक्‍यातील टेंभुर्णा येथेही आज, 13 मार्चला दुपारी एकच्‍या सुमारास महावितरणच्‍या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांवर तिघांनी हल्ला चढवला.

या प्रकरणी कोलोरी वितरण केंद्राचे सहायक अभियंता कुणाल ठाकरे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी सदानंद तुळशीराम मोरे, श्रीकृष्ण तुळशीराम मोरे, गजानन तुळशीराम मोरे (सर्व रा. टेंभुर्णा) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. कुणाल ठाकरे आणि त्‍यांचे सहकारी टेंभुर्णा येथे थकीत विजबिल वसुलीचे काम करत होते. यावेळी त्‍यांना सदानंद मोरेच्‍या घरासमोर लाकडी बल्ली टाकून अवैधरित्या वीज घेतल्याचे आढळले. त्‍याने तारेवर आकडा टाकला होता. आकडा काढून टाका, असे अधिकाऱ्यांनी त्‍यांना सांगताच मोरे याने वाद घालायला सुरुवात केली. त्‍यानंतर सदानंद, श्रीकृष्ण आणि गजानन यांनी महावितरणच्या पथकावर विटा फेकून मारल्या. जीवे मारण्याची धमकी देत अश्लील शिविगाळ केली. त्‍यावरून गुन्‍हा दाखल करण्यात आला.