महिलेच्‍या फोटोखाली अश्लील कमेंट..; तिच्‍या पतीला मेसेंजरद्वारे घाणेरडे व्हिडिओ… बुलडाणा सायबर पोलिसांनी वाचा कशा सिनेस्‍टाइल आवळल्‍या आरोपीच्‍या मुसक्‍या!!; शेगावची घटना

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कुणाच्या फोटोखाली कसलीही घाणेरडी कमेंट करून नामानिराळे राहू, असे काही महाभागांना वाटत असते. पण तांत्रिक पद्धतीने तपास करून अशा महाभागाला पोलीस शोधू शकतात आणि अटकही करू शकतात. बुलडाणा सायबर पोलीस ठाण्याने शेगाव येथील एका प्रकरणातील आरोपीस नांदेड जिल्ह्यातून पकडून आणले. या आरोपीने एका महिलेच्या फोटोखाली अश्लील कमेंट …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कुणाच्‍या फोटोखाली कसलीही घाणेरडी कमेंट करून नामानिराळे राहू, असे काही महाभागांना वाटत असते. पण तांत्रिक पद्धतीने तपास करून अशा महाभागाला पोलीस शोधू शकतात आणि अटकही करू शकतात. बुलडाणा सायबर पोलीस ठाण्याने शेगाव येथील एका प्रकरणातील आरोपीस नांदेड जिल्ह्यातून पकडून आणले. या आरोपीने एका महिलेच्‍या फोटोखाली अश्लील कमेंट केली होती व तिच्‍या पतीला मेसेंजरद्वारे नग्‍न व्हिडिओ पाठवले होते.

तात्‍याराव पिराजी वाघमारे (रा. मंगलसांगवी, ता. कंधार, जि. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले, की शेगावच्‍या शिवाजीनगर भागातील एका विवाहितेने १६ एप्रिलला या प्रकरणात तक्रार केली होती. मकरसंक्रांत सणाच्‍या दिवशी या विवाहितेने काढलेले फोटो तिच्‍या पतीने त्‍यांच्‍या फेसबुक खात्‍यावर पोस्‍ट केले होते. या फोटोंखाली तात्‍याराव वाघमारे याने अश्लील कमेंट केली होती. त्‍यानंतर नग्‍न अश्लील व्हिडिओ व आक्षेपार्ह फोटो त्‍याने तिच्‍या पतीच्‍या फेसबुक मेसेंजरवर पाठवले. हे फोटो पाहून तिला आणि तिच्‍या पतीला मानसिक त्रास झाला. तिने पतीला सोबत घेऊन या प्रकरणाची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात केली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी बुलडाणा सायबर पोलीस ठाण्याकडे सोपवले. सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. विवाहिता आणि तिच्‍या पतीची विचारपूस केली. दोघांचे फेसबुक खाते चेक केले. तांत्रिक माहिती मिळण्यासाठी फेसबुक एजन्‍सी, गुगल यांच्‍याकडून तात्‍याराव वापरत असलेल्या मोबाइल क्रमांकाचा शोध लावला. त्‍यावरून फेसबुकवर अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवणारा तात्‍याराव असल्याचे समोर आले.

मुसक्‍या आवळून आणले शेगावमध्ये…
कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्‍या आदेशाने तपास अधिकारी पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी आरोपीला पकडून आणण्यासाठी पोलीस पथक तयार केले. सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप यांच्‍या नेतृत्त्वात पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, पवन मखमले, योगेश सरोदे, चा.पो.काँ. राजदीप वानखेडे यांना तात्‍यारावचे लोकेशन व शोध घेऊन अटक करण्यासाठी पाठविण्यात आले. त्‍यांनी मंगलसांगवी (जि.नांदेड) येथे जाऊन तात्‍यारावच्‍या घरातून मुसक्‍या आवळल्‍या. गुन्ह्यात वापरलेला मोबाइलही जप्‍त करण्यात आला. नांदेडच्‍या उस्‍माननगर पोलीस ठाण्यात अटकेचे सोपस्कार पार पाडून त्‍याला घेऊन हे पथक शेगावमध्ये दाखल झाले. शेगाव शहर पोलिसांच्‍या ताब्‍यात त्‍याला देण्यात आले.

कुठलीही माहिती नसताना कामगिरी
सायबर पोलिसांकडे हा गुन्‍हा तपासासाठी आला तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे कुठलीही माहिती नव्‍हती. मात्र तांत्रिक पद्धतीने, कौशल्याने त्‍यांनी तपास करून आरोपीला अटक केली. यापुढेही फेसबुक, व्‍हॉट्‌स ॲप, इन्‍स्‍टाग्राम, व्‍टिटर, सोशल मीडियावरून महिला, तरुणींची बदनामी झाल्‍यास त्‍यांनी संबंधित पोलीस ठाण्यात निसंकोचपणे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी केले आहे.