माजी आमदार राहुल बोंद्रेंच्या अडचणींत वाढ!

अनुराधा सहकारी बँकेवर फौजदारीसाठी कारवाईसाठी विरोधी पक्ष आक्रमक! बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या चिखली येथील अनुराधा नागरी सहकारी बँकेने शेतकरी कर्जमाफीत मोठी लूट केल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज, 10 मार्चला विधानसभेत केला. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला …
 

अनुराधा सहकारी बँकेवर फौजदारीसाठी कारवाईसाठी विरोधी पक्ष आक्रमक!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या चिखली येथील अनुराधा नागरी सहकारी बँकेने शेतकरी कर्जमाफीत मोठी लूट केल्‍याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज, 10 मार्चला विधानसभेत केला. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत श्री. फडणवीस सहभागी झाले.

2006 -07 आणि 2007-08 मध्ये अनुराधा सहकारी बँकेने 8.54 लक्ष रुपये कृषी कर्ज थकीत असल्याचे दाखवले होते. मात्र 2008 च्या कर्जमाफीवेळी बँकेने सरकारकडे  2 कोटी 35 लक्ष रुपयांची मागणी केली. सरकारनेही ती मागणी मान्य करत बँकेला 2कोटी 35 लक्ष कर्जमाफीसाठी दिले. जे खातेदार नाहीत त्यांना खातेदार व जे कर्जदार नाहीत त्यांना कर्जदार दाखवून अनुराधा नागरी सहकारी बँकेने मोठा भ्रष्टाचार केला आहे. मात्र सरकार या बँकेला पाठीशी घालत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे अनुराधा बँकेकडून 18 टक्के दंडनीय व्याजाने ही रक्कम वसूल करावी. केंद्र व राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार श्वेताताई महाले,आमदार संजय कुटे यांनी केली. 14 डिसेंबर 2020 रोजी आमदार श्वेताताई महाले यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.त्यावर एक समिती गठन करण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे उत्तर यावेळी सहकार मंत्र्यांनी दिले. मात्र  या समितीच्या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न होऊनही सरकार बँकेला पाठिशी घालत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे अनुराधा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्‍यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.