‘मी नाही हो अवैध सावकार… नोकरीच्‍या आमिषाने माझ्याकडूनच घेतले १५ लाख!’; मेहकरच्या ‘त्या’ प्रकरणाची दुसरी बाजू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मी ना सावकार, ना अवैध सावकार… मेहकरच्या एका हॉस्पिटलमध्ये शिपायाची नोकरी करतो. ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे त्या तीन एकर जमिनीशिवाय माझ्याकडे कोणतीही मालमत्ता नाही. माझी तीन एकर जमीन विकायला लावून मला नोकरी देण्याचे आमिष दाखवून माझ्याकडूनच सखाराम काळदाते याने १५ लाख रुपये घेतले. नोकरी न लावल्याने त्याने त्याच्याकडील तीन …
 
‘मी नाही हो अवैध सावकार… नोकरीच्‍या आमिषाने माझ्याकडूनच घेतले १५ लाख!’; मेहकरच्या ‘त्या’ प्रकरणाची दुसरी बाजू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मी ना सावकार, ना अवैध सावकार… मेहकरच्या एका हॉस्पिटलमध्ये शिपायाची नोकरी करतो. ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे त्या तीन एकर जमिनीशिवाय माझ्याकडे कोणतीही मालमत्ता नाही. माझी तीन एकर जमीन विकायला लावून मला नोकरी देण्याचे आमिष दाखवून माझ्याकडूनच सखाराम काळदाते याने १५ लाख रुपये घेतले. नोकरी न लावल्याने त्याने त्याच्याकडील तीन एकर जमीन लिहून दिली. मात्र आता जमिनीचे भाव वाढल्याने त्याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझ्याविरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल केला… अशी कैफियत गजानन रामचंद्र गायकवाड (रा. राजपूत गल्ली, मेहकर) यांनी आज, २३ जूनला बुलडाणा लाइव्ह कार्यालयात येऊन ऐकवली.

अवैध सावकारीच्या प्रकरणात गायकवाड यांच्याविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मेहकरचे प्रभारी सहाय्यक निबंधक फाटे यांनी स्वतः याप्रकरणी फिर्याद दिली होती. लोणीगवळी (ता. मेहकर) येथील सखाराम शंकरराव काळदाते यांनी गायकवाड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. यापोटी तीन एकर जमीन अटकाव म्हणून दिली होती. पैशांची व्याजासह परतफेड करूनही गायकवाड यांनी जमीन परत न करता तीन एकर जमीन हडपल्‍याचे तक्रारीत म्हटले होते. यावरून गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे वृत्त बुलडाणा लाइव्‍हमध्ये प्रसिद्ध होताच गायकवाड यांनी तातडीने बुलडाणा लाइव्‍हशी संपर्क करून, सर्व प्रकरण समोर मांडले. आज त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हमध्ये येऊन आपली बाजू मांडली.

अशी आहे दुसरी बाजू…
गायकवाड यांनी बुलडाणा लाइव्‍हला केलेल्या लेखी खुलाशानुसार, गायकवाड आणि काळदाते दोघेही सख्खे आत्‍येभाऊमामेभाऊ आहेत. सखाराम काळदाते हे लोणीगवळी येथील रावसाहेब पाटील विद्यालयात नोकरीला आहेत. ते त्या संस्थेचे सचिवही आहेत. २०१४ मध्ये संस्थेत शिपाई व लॅब असिस्टंटच्या जागा भरायच्या आहेत. त्यासाठी तू तुझी गावची जमीन विक व १५ लाख रुपये भर. मी तुझ्या नोकरीचे जमवून देतो, असे काळदाते यांनी गायकवाड यांना म्हटले. नोकरीच्या हव्‍यासापोटी गायकवाड यांनी त्यांची उटी घुटी (ता. मेहकर) येथील तीन एकर जमीन विकून व काही पैसे नातेवाइकांकडून उसने आणून १५ लाख रुपये काळदाते यांच्याजवळ दिले, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. मात्र २ ते ३ वर्षे उलटूनही गायकवाड यांना नोकरी न मिळाल्याने त्यांनी काळदाते यांच्याकडे दिलेले १५ लाख रुपये परत मागितले. तेव्हा काळदाते यांनी त्यांच्याकडील लोणीगवळी येथील तीन एकर जमीन गायकवाड यांना खरेदी करून दिली. तुला नोकरी लागेपर्यंत ही जमीन तुझ्याकडे राहू दे, असे सांगितले. मात्र ६ वर्षे उलटूनही गायकवाड यांना संस्थेत नोकरी लागली नाही.

दरम्यानच्या काळात काळदाते यांनी गायकवाड यांना खरेदी करून दिलेली जमीन ही समृद्धी महामार्गालगत असल्याने भाव प्रचंड वाढल्याने काळदाते यांनी जमीन परत मिळवण्यासाठी खटाटोप सुरू केला. गेल्या वर्षी गायकवाड यांना या जमिनीवर कर्ज घ्यायचे असल्याने जमिनीशी संबंधित कागदपत्रे व तीन कोरे स्टँप घेऊन आतेभाऊ व मामेभाऊ असलेले काळदाते- गायकवाड दोघे बँकेत गेले. मात्र कोविड 19 मुळे व्यवहार बंद असल्याने गायकवाड यांची कर्जाशी संबंधित कागदपत्रे काळदाते यांच्या घरी ठेवली. त्यामुळे विकलेली जमीन परत मिळवण्याचे पक्के ठरवलेल्या काळदाते यांनी गायकवाड यांनी विश्वासाने ठेवलेल्या कागदपत्रांचा व कोऱ्या स्टॅम्पचा गैरवापर केला. प्रभारी सहाय्यक निबंधक यांनीही या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार करून खोटी तक्रार दाखल केली असल्याचा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी केला आहे. खोट्या गुन्ह्याविरोधात बुलडाणा येथील जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात अपील केले आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.