मुकुल वासनिकांना लागणार राज्यसभेचा “जॅकपॉट’!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिल्लीत व पक्षात आपले स्थान निर्माण करतानाच गांधी घराण्याशी असलेले घनिष्ठ संबंध, राष्ट्रीय संघटनेत असलेले मोठे पद आणि पक्षासाठी फुल टाइम काम असा ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचा कामगिरीवजा आलेख आहे. मात्र अनेक वर्षांपासून ते राजकीय पदापासून किंबहुना खासदार पदापासून दूर आहेत. ही त्यांची वा त्यांच्या …
 
मुकुल वासनिकांना लागणार राज्यसभेचा “जॅकपॉट’!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिल्लीत व पक्षात आपले स्थान निर्माण करतानाच गांधी घराण्याशी असलेले घनिष्ठ संबंध, राष्ट्रीय संघटनेत असलेले मोठे पद आणि पक्षासाठी फुल टाइम काम असा ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचा कामगिरीवजा आलेख आहे. मात्र अनेक वर्षांपासून ते राजकीय पदापासून किंबहुना खासदार पदापासून दूर आहेत. ही त्यांची वा त्यांच्या खऱ्या चाहत्यांची खंत सध्या सुरू असलेल्या एका राजकीय घडामोडीमुळे दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात यासाठी नशिबासह सर्व योग जुळून आले (च) किंवा राजकीय सारीपाटावर सर्व सोंगट्याचे दान अनुकूल पडले तरच हे शक्य होणार आहे.

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कमी कालावधीत नावलौकिक मिळविणारे आणि गांधी कुटुंबियाचा विश्वास प्राप्त करणारे आणि राहुल ब्रिगेडचे सदस्य युवा नेते राजीव सातव यांच्या दुर्दैवी निधनाने राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. एकूण 7 जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यापासून आपली राजकीय इनिंग सुरू करणारे अन्‌ थेट दिल्लीपर्यंत पोहोचणारे व सध्याचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र उमेदवारीसाठी त्यांना कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी तथा प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहे.

याशिवाय ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद, मिलिंद देवरा, अनंत गाडगीळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उत्तमसिंह पवारांसारखे दिग्गज नेते देखील इच्छुक आहे. यामुळे उमेदवारी मिळणे म्हणजे मोठी अग्निपरीक्षा ठरावी. याचे कारण त्यासाठी असलेली तीव्र चुरस, आझाद यांना पक्षाने अलीकडेच दिलेला शब्द, युवराज राहुल गांधी यांचे खासमखास देवरा, सध्याची राजकीय स्थिती, नजीकच्या काळातील निवडणुका, काँग्रेस अंतर्गत “जी-23′ च्या माध्यमाने पक्षातून उठविण्यात आलेला आवाज व त्यात असलेला समावेश अशा अनेक साधकबाधक बाबी लक्षात घेऊन उमेदवारी ठरणार आहे.

राजकीय साडेसाती…
यामुळे दिल्लीत वजन असले तरी वासनिकांसारख्या नेत्यालाही उमेदवारी मिळवणे वाटते तितके सोपे नाही. आता ही उमेदवारी म्हणजे विजयाचा हमखास राजमार्ग किंबहुना खासदार बनून सभागृहात पोहोचण्याचा शॉर्टकट आहे असे म्हणता येईल. राज्यसभेच्या निवडणुका सहसा अविरोध करण्याची परंपरा आहे. यामुळे मागील कमीअधिक सात साडेसात वर्षांपासून खासदार नसलेल्या वासनिकांसाठी ही मोठी राजकीय (सुवर्ण)संधी मानली जात आहे. सभागृहाबाहेर असणे हा निकष मानला तर हा दीर्घ कालावधी त्यांच्यासाठी राजकीय साडेसाती ठरला असे सांगता येईल. नागपूर विद्यापीठात प्रारंभिक धडे गिरविल्यावर बुलडाणा मतदारसंघातून 1984, 1991 व 1998 अश्या तीनवेळा त्यांनी खासदारकी मिळविली. एवढेच तर केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविले. बुलडाणा ओपन झाल्यावर 2009 साली रामटेक मतदार संघातून विजय मिळवीत ते केंद्रीय मंत्री झालेत. यामुळे आता ब्रेक के बाद त्यांना पुन्हा संधी मिळणार काय? हा प्रश्न लक्षवेधी ठरलाय! राजकीय धुरंधर असलेल्या वासनिकांनी आपली पक्षातील ताकद अनेकदा दाखविली आहे. आताही ते त्यासाठी सरसावले आहे,ते सहजासहजी मागे हटण्यासाठी नाहीच. अर्थात हे तिकीट म्हणजे त्यांच्यासाठी केवळ राजकीयच नव्हे बर्थडे गिफ्टही ठरणार आहे. याचे कारण राज्यसभेसाठी माघारी ची अंतिम तारीख 27 सप्टेंबर आहे आणि तीच त्यांची बर्थडे सुद्धा आहे.