मुदतठेव रकमेतून बालकांनी पालकांची स्वप्नपूर्ती करावी : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे प्रतिपादन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोविडचा काळ अत्यंत हलाखीचा होता. या काळात नको असतानाही अनेक गोष्टी कराव्या लागल्या. या साथीत अनेकांनी आपले आप्तेष्ट, आई – वडील, मित्र गमावले. अशा परिस्थितीत कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेले मुले यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाने अशा बालकांचे भविष्य घडविण्यासाठी ५ लक्ष रुपये मुदतठेव देण्याचा निर्णय घेतला. …
 
मुदतठेव रकमेतून बालकांनी पालकांची स्वप्नपूर्ती करावी : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे प्रतिपादन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोविडचा काळ अत्यंत हलाखीचा होता. या काळात नको असतानाही अनेक गोष्टी कराव्या लागल्या. या साथीत अनेकांनी आपले आप्तेष्ट, आई – वडील, मित्र गमावले. अशा परिस्थितीत कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेले मुले यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाने अशा बालकांचे भविष्य घडविण्यासाठी ५ लक्ष रुपये मुदतठेव देण्याचा निर्णय घेतला. शासनाने दिलेल्या मुदतठेव रकमेतून अशा बालकांनी आई – वडिलांची त्यांच्या विषयी असलेली स्वप्ने साकारावी, असा आशावाद पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.

महिला व बालविकास विभागातर्फे कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र आणि ५ लक्ष रुपये मुदतठेव रक्कम प्रमाणपत्राचे वितरण आज, १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती कस्तुरे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी आदी उपस्थित होते.

कोरोना काळात लॉकडाऊन हा शब्द पहिल्यांदा माहिती पडल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की या काळात सार्वजनिक ठिकाणे बंदच होती. कोविडवर मात करण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. राज्य शासनाने लसीकरण वाढविण्यासाठी कवच कुंडल मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून लसीकरण करून घ्यावे. लसींचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले. ते म्हणाले, की अनाथ बालके, एक पालक असलेल्या बालकांचा संबंधित विभागाने शोध घ्यावा. त्यांच्यासाठी सुद्धा शासन मदत करणार आहे, असे ते म्‍हणाले.

प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मारवाडी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले, की कोरोना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ४१४ बालके एक पालक किंवा दोन पालक गमावलेली आहेत. अशी अनाथ बालके असल्यास त्यांची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते १३ अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र व ५ लक्ष रुपये मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोविड काळात अनाथ बालकांना सहकार्य करणारे ॲड. मीरा बावस्कर, डॉ. अश्विनी शेवाळे, अदिती अर्बन बँकेचे संचालक सुरेश देवकर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरीता जाधव यांनी केले. अनाथ बालकांची माहिती व आभार प्रदर्शन बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले. कार्यक्रमाला अनाथ बालके, त्यांचे पालकमत्व स्वीकारलेले कुटूंबीय, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.