मुलाला म्‍हणे इथेच थांब..येतो अर्ध्या तासात… वडील परतलेच नाहीत… शेगावमध्ये हरवल्याची तक्रार दाखल, मोबाईल दुकानातून बेपत्ता झाला व्‍यक्‍ती!; जिल्ह्यातून दोन दिवसांत ५ तरुणीही बेपत्ता!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोबाइल दुरुस्तीस वेळ लागत असल्याने मुलाला दुकानातच थांबवून अर्ध्या तासात येतो म्हणून गेलेला व्यक्ती गायब झाला आहे. पती हरवल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीने केली आहे. सौ. सुलभा पुरुषोत्तम वाकडे (32, रा. नागद, ता. बाळापूर जि. अकोला) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोबाइल दुरुस्‍तीस वेळ लागत असल्याने मुलाला दुकानातच थांबवून अर्ध्या तासात येतो म्‍हणून गेलेला व्‍यक्‍ती गायब झाला आहे. पती हरवल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात त्‍याच्‍या पत्‍नीने केली आहे.

सौ. सुलभा पुरुषोत्तम वाकडे (32, रा. नागद, ता. बाळापूर जि. अकोला) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की 29 जून रोजी सकाळी आठ वाजता त्यांचे पती पुरुषोत्तम भाऊराव वाकडे (36) नागद येथून मोटरसायकलने मुलगा प्रणव (14) याला सोबत घेऊन शेगावला गेले होते. सकाळी नऊच्या सुमारास मोबाइल दुरुस्त करण्यासाठी ते वैष्णवी मोबाईल शॉपी येथे गेले होते. मोबाइल दुरुस्तीस अर्धा तास वेळ लागणार असल्याचे पाहून त्‍यांनी प्रणवला तू दुकानातच थांब. मी अर्ध्या तासात परत येतो, असे सांगून मोटरसायकलने निघून गेले. त्यानंतर ते गायब झाले. मुलगा प्रणव बराच वेळ वाहत वाट पाहत बसला. मात्र ते परत आले नाही. त्यानंतर नातेवाइक व इतर ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते मिळून आले नाही. त्‍यामुळे सौ. सुलभा यांनी हरवल्याची तक्रार देऊन पतीला शोधण्याची विनंती केली आहे.

दोन दिवसांत 5 तरुणी बेपत्ता
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातून 5 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. खामगाव शहरातील घाटपुरी येथून 24 वर्षीय शीतल विजय निंबाळकर, खामगाव शहरातूनच महाकाल चौक भागात राहणारी 20 वर्षीय पूजा राजू भटकर, सुटाळा बुद्रूक भागातील इंदिरानगर येथील 25 वर्षीय सौ. मैना देविदास डाबेराव या तिघी बेपत्ता झाल्या आहेत. त्‍या हरवल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्‍यातील सुनगाव येथून 22 वर्षीय दीपाली अर्जुन पाटील ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील चारखांबा चौक भागातील रहिवासी अर्चना राजेंद्र भोलनकर ही 20 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची तक्रार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.