मुलीची छेड काढली, लग्‍नाचा प्रस्‍ताव घेऊन गेले…नकार मिळाला तर काकाला भरस्‍त्‍यात ठार केले!; मुलीचे वडील गंभीर जखमी, जामोदमधील थरार

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीला छेड काढून त्रास दिल्यानंतर थेट तिच्या घरी लग्नासाठी मागणी घालण्यात आली. तिच्या वडील व काकांनी नकार दिला असता संतापलेल्या चौघांनी या दोघांना जबर मारहाण सुरू केली. यात मुलीच्या काकाचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना आधी जळगाव जामोदच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर खामगावच्या सामान्य …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीला छेड काढून त्रास दिल्यानंतर थेट तिच्‍या घरी लग्‍नासाठी मागणी घालण्यात आली. तिच्‍या वडील व काकांनी नकार दिला असता संतापलेल्या चौघांनी या दोघांना जबर मारहाण सुरू केली. यात मुलीच्‍या काकाचा मृत्‍यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांना आधी जळगाव जामोदच्‍या ग्रामीण रुग्‍णालयात व नंतर खामगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात हलवण्यात आले. रस्‍त्‍यावर झालेल्या या राड्याने जामोदमधील जोहरीपुऱ्यात (ता. जळगाव जामोद) काल, ३१ ऑगस्‍टला सायंकाळी साडेसहाच्‍या सुमारास खळबळ उडाली होती. मारो, काटो, सबक सिखाओ… ही आरडाओरड आजही गल्लीतील रहिवाशांच्‍या अंगावर शहारे आणत अाहे. या प्रकरणात रात्रीच तिघांना अटक करण्यात आली आहे.

नूर खान समशेर खान (३२, रा. जामोद) असे हत्‍या झालेल्याचे नाव असून, रसूल खान समशेर खान असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणात सय्यद अमीन सय्यद अफसर (२२, रा. जामोद) याने तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी शेख सद्दाम ऊर्फ सरदार शेख नजीर, शेख नजीर शेख कदीर, शेख जुनेद ऊर्फ बशीर शेख नजीर, शेख जुबेर शेख नजीर (सर्व रा. जोहरीपुरा, जामोद, ता. जळगाव जामोद) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

गंभीर जखमी रसूल खान याची मुलगी आफरीन दहावीत शिकते. ती शाळेत जात असताना शेख सद्दाम उर्फ सरदार नेहमी तिची छेड काढतो. त्‍याने तिला त्रास देऊ नये म्‍हणून तिचे काका नूर खान यांनी त्‍याची कानउघडणी केली होती. सद्दामने ही बाब घरी सांगितल्यानंतर त्‍याचे वडील शेख नजीर याने शेख सद्दामसाठी आफरीनचा हात मागितला. लग्‍नाचा प्रस्‍ताव घेऊन तो आफरीनचे वडील रसूल खान यांच्‍याकडे गेला होता. मात्र त्‍यांनी प्रस्‍ताव नाकारला. त्यामुळे शेख नजीरला राग आला. त्‍याने तिथेच मुलीला पळवून नेऊ, अशी धमकी दिली होती. ही घटना दहा-बारा दिवसांपूर्वीची आहे. मात्र या घटनेमुळे दोन्‍ही कुटुंबात तेव्‍हापासून धुसफूस सुरू होती. काल सायंकाळीही शेख नजीर याने आफरीनचे काका नूर खान यांना लग्‍नासाठी बोलचाल करायला बोलावले. त्‍यांनीही नकार दिला. त्‍यामुळे शेख नजीर चिडला. त्‍याने तिथेच नूर खान यांना मारहाण करायला सुरुवात केली. नूर खान घराबाहेर पळाले असता तेही त्‍यांच्‍यामागे धावले. त्‍यानंतर शेख सद्दामच्या घरासमोर साडेसातच्‍या सुमारास रोडवरच हाणामारी सुरू झाली. नूर खान समशेर खान यांच्‍या डोक्‍यात शेख बशीर ऊर्फ जुनेद शेख नजीर याने लोखंडी रॉडने वार केला. त्यामुळे ते कोसळले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे भाऊ रसूल खान धावले. त्‍यांनाही शेख सद्दामने चाकूने पोटावर, मांडीवर व डोक्यात वार करून मारहाण करायला सुरुवात केली.

शेख नजीर याने नूर खान यांच्‍या पायावर काठीने मारहाण केली. शेख जुबेर याने रसूल खान यांच्‍या पाठीवर काठीने मारहाण केली. यातून एखाद्याचा जीव जाण्याची शक्‍यता बघून शेख इमरान, मोहम्मद निशाद, शेख मुफीस उर्फ शेरू, रफीक खान, शेख सलमान, इस्माइल खान हे भांडण सोडवायला धावले. भांडण सोडवून त्‍यांनी नूर खान आणि रसूल खान यांना जळगाव ग्रामीण रुग्‍णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्‍टरांनी नूर खान यांचा मृत्‍यू झाल्याचे सांगितले. गंभीर जखमी रसूल खान यांना खामगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात हलविण्यात आले आहे. त्‍यांची प्रकृती चिंताजनक आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन वाकडे करत आहेत.