मूलबाळ होत नसल्याने सासरच्याकडून छळ; 21 वर्षीय विवाहितेने घरातच घेतला गळफास!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः मूलबाळ होत नाही म्हणून सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोजी सकाळी समोर आली. विवाहितेच्या आईने आज खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार केल्याने पोलिसांनी पतीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती लता वासुदेव जाधव …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः मूलबाळ होत नाही म्‍हणून सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना 7 मे रोजी सकाळी समोर आली. विवाहितेच्‍या आईने आज खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार केल्याने पोलिसांनी पतीसह 6 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

श्रीमती लता वासुदेव जाधव (50, रा. लोखंडा) यांनी तक्रार दिली की, शंकरनगर घरकुलमध्ये त्‍यांची मुलगी सौ. सीमा किरण तायडे (21) राहत होती. तिने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर खिडकीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोजी सकाळी 8 वाजता समोर आली. सीमाचे लग्‍न किरण तायडेसोबत सन 2019 – 20 मध्ये झाले होते. तिला मूल बाळ होत नव्हते. त्यामुळे पती किरण मनोहर तायडे (29), सासरा मनोहर तायडे (60), सासू सौ. अरुणा मनोहर तायडे (56), जेठ सागर मनोहर तायडे (35), जेठाणी सौ. शीतल सागर तायडे (30), नणंद राणी तायडे (19, सर्व रा. शंकरनगर) हे सर्व जण सीमाला शारीरिक व मानसिक त्रास देत होते.

याबाबत सीमाने वेळोवेळी आईला सांगितले. पण वर्षभरापासून कोरोनामुळे सासरची मंडळी तिच्‍या आईची सीमासोबत भेट होऊ देत नव्हते. त्‍यातच काल फोनवरून माहिती मिळाली की त्‍यांची मुलगी सीमा सिरीयस असून, तिला सामान्य रुग्णालय खामगाव येथे भरती केले आहे. लता जाधव या सामान्य रुग्णालयात गेल्‍या असता सीमा ही मृत्यू पावली होती. सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्‍यांना कळले. त्‍यानंतर लता जाधव यांनी खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली. तपास सहायक पोलीस निरिक्षक नीलेश सरदार करत आहेत.