मृतात्‍म्यांच्‍या शांतीसाठी मलकापुरात हॉटेल मालकाची स्मशानभूमीत अघोरी पूजा!; साधूमांत्रिकांचे मंत्रोच्‍चार सुरू असतानाच “असा’ उधळला डाव!!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वडील व भावाच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी माता महाकालीनगरमधील सीटी पॅलेस हॉटेलचे मालक आशिष गोठी याने अमावस्येच्या रात्रीच्या अंधारात (९ जुलैच्या रात्री ८:३० वाजेदरम्यान ) माता महाकाली स्मशानभूमीत तीन साधू मांत्रिकांच्या सहाय्याने अघोरी पूजा आयोजित केली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच महिला व पुरुषांनी हा अघोरी पूजेचा डाव उधळून …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वडील व भावाच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी माता महाकालीनगरमधील सीटी पॅलेस हॉटेलचे मालक आशिष गोठी याने अमावस्येच्या रात्रीच्या अंधारात (९ जुलैच्या रात्री ८:३० वाजेदरम्यान ) माता महाकाली स्मशानभूमीत तीन साधू मांत्रिकांच्या सहाय्याने अघोरी पूजा आयोजित केली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच महिला व पुरुषांनी हा अघोरी पूजेचा डाव उधळून लावत संबंधितांना पोलिसांच्या हवाली केले. यावरून पोलिसांनी गोठीसह साधूमांत्रिकांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.

माता महाकालीस्थित भारत बेकरीसमोर असलेल्या सिटी पॅलेस हॉटेलचे मालक स्व. अशोक गोठी यांचे काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या एका मुलाचे सुध्दा काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. त्या दोघांची आत्मशांती झाली नसल्याने आपल्या कुटुंबियात शांतता भंग पावली आहे. यावर उपाययोजना म्हणून माता महाकाली स्मशानभूमीत तीन साधू मांत्रिकांसमवेत दिवे लावून अघोरी पुजा करत मंत्रोपचार करीत प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार आशिष गोठी यांनी सुरू केला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच बहुसंख्य महिला व नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी करून हा अघोरी पूजेचा प्रकार उधळून लावत मलकापूर शहर पोलिस स्टेशनला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्मशानभूमी गाठून आशिष गोठी व त्या तीन साधू मांत्रिकांना ताब्यात घेऊन त्या परिसरामध्ये अघोरी पूजा करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक एस. जी. ठाकरे यांनी आशिष गोठी व तीन मांत्रिकांसह चार जणांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.