मेहकरजवळ खोदकामात आढळले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष!; जिल्ह्यात कुतूहल, पुरातत्‍व विभाग आता पुढचे ‘रहस्‍य’ उलगडणार!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरानजिक जानेफळ रस्त्यावरील एका शेतालगतच्या नाल्याचे खोदकाम सुरू असताना हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळले आहेत. आज, 27 मे रोजी सकाळी काही मजूर अनिल महादेव इंगळे यांच्या शेतात खोदकाम करत असताना हा प्रकार समोर आला. सध्या खोदकाम थांबवण्यात आले असून, पुढील खोदकाम पुरातत्व विभागाकडून केले जाणार आहे. या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरानजिक जानेफळ रस्‍त्‍यावरील एका शेतालगतच्‍या नाल्याचे खोदकाम सुरू असताना हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळले आहेत. आज, 27 मे रोजी सकाळी काही मजूर अनिल महादेव इंगळे यांच्‍या शेतात खोदकाम करत असताना हा प्रकार समोर आला. सध्या खोदकाम थांबवण्यात आले असून, पुढील खोदकाम पुरातत्‍व विभागाकडून केले जाणार आहे. या घटनेमुळे मेहकरचा ऐतिहासिक वारसा पुन्‍हा एकदा उजळला आहे.

मेहकर येथील अनिल महादेव इंगळे यांचे मेहकर-जानेफळ रोडवर सर्वे नंबर 33 मध्ये शेत आहे. शेताच्‍या बाजूने पैनगंगा नदी वाहते. नदी जवळच नाला असून, या नाल्याचे खोलीकरण करून त्‍यातील माती शेतात टाकण्याचे काम मजुरांकरवी करून घेतले जात होते. सकाळी 20 फूट खोलवर अचानक हेमाडपंथी मंदिराचे अवशेष लागले. ओटा, नंदी, काही खांब, कोरीव पायऱ्या आढळताच शेतमालक इंगळे यांनी तहसीलदार संजय गरकल यांना माहिती दिली. त्‍यांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. त्‍यानंतर पुरातत्‍व विभागाला कळविण्यात आले. सध्या या स्‍थळी तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे. पुढचे खोदकाम पुरातत्‍व विभागाकडून होणार आहे.

पैनगंगेच्या तीरावर हे हेमाडपंथी मंदिर शेकडो वर्षांपूर्वी नदीच्या पाण्यामुळे जलमय झाले असावे, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. मंदिर आढळल्‍याची माहिती मिळताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. खोदकामात आणखी काय काय समोर येईल याबद्दल आता सर्वांना उत्‍सुकता निर्माण झाली आहे. मेहकरला ऐतिहासिक वारसा असून, शहरात शेकडो वर्षे जुना कंचनीचा महाल आहे. ऐतिहासिक बालाजी मंदिर आहे. ओलांडेश्वर मंदिराच्या बाजूला राम राज्यातील ऐतिहासिक असे कुंड, दगडी सभामंडप आहे. मेहकर शहराच्या मध्यभागी पाचपीर बाबाची दर्गा तर खालचे स्टॅन्ड येथे शेकडो वर्षे जुने दगडाचे सभागृह आहे. त्यात आणखी एका ऐतिहासिक वारशाची भर पडल्याने मेहकरच्‍या लौकिकात भरच पडली आहे.