मेहकर तालुक्‍यातील त्‍या 11 शेतकऱ्यांचे ‘कल्याण’; वाचा कसे झाले समृद्ध!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सगळीकडे कोरोनाची दहशत असताना शेतकरी राजा मात्र काळ्या मातीत राब राब राबत होता. कृषी क्षेत्र गतिमान ठेवून अर्थचक्र फिरवत होता. यात जिल्ह्यातील शेतकरीही मागे नव्हता. मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत रेशीम शेती केली. त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतून रेशीम शेतीतून समृद्धी आणली आहे. रेशीम शेतीमधील किटक संगोपनाची कामे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सगळीकडे कोरोनाची दहशत असताना शेतकरी राजा मात्र काळ्या मातीत राब राब राबत होता. कृषी क्षेत्र गतिमान ठेवून अर्थचक्र फिरवत होता. यात जिल्ह्यातील शेतकरीही मागे नव्हता. मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत रेशीम शेती केली. त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतून रेशीम शेतीतून समृद्धी आणली आहे.

रेशीम शेतीमधील किटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात. परंतु या शेतकऱ्यांनी मनरेगा योजनेतून रेशीम कीटक संगोपन घेतले आणि यशस्वीपणे पूर्णही केले. अंदाजे 650 ते 700 किलो ग्रॅम कोष उत्पादन त्यांना होणार आहे. सध्या 280 ते 310 रुपये प्रति किलोग्रॅम भाव कोषबाजारात आहे. या उत्पादनातून शेतकऱ्यांना अंदाजे 1.5 ते 2 लक्ष रुपयांचे उत्पन्न निश्चितच मिळणार आहे. अवघ्या 18 दिवसात त्यांनी कोषाचे संगोपन पूर्ण केले आहे. तुती लागवड करून तुती पानांचा रेशीम कीटकांना खाद्य म्हणून उपयोग केला जातो. त्यापासून रेशीम कोष निर्मिती होते. असे कोष जालना, पूर्णा, पाचोड व इतर कोष खरेदी करणारे व्यापारी यांना विक्री केली जाते. सन 2020-21 मध्ये कल्याणा येथील युवा शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्याचे ठरविले. या 11 लाभार्थ्यांनी रेशीम अधिकारी कार्यालयात नोंदणी केली. उद्योगाची परिपूर्ण माहिती घेतली.

जून 2020 मध्ये तुती लागवड रोपांद्वारे करून नोव्हेंबर 2020 मध्ये रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. मनरेगा अंतर्गत कामानुसार यथायोग्य मजुरी व तुती लागवडीच्या रोपांची रक्कम मिळाली. पहिले पीक हिवाळ्यात घेतले, परंतु पहिले पीक, त्यात ऋतुमानानुसार येणाऱ्या अडचणींमुळे सरासरी उत्पन्न मिळाले. परंतु इतक्यावरच समाधान न मानता उन्हाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत रेशीम कीटक संगोपन घेण्याचे त्यांनी ठरविले. साधारणतः उन्हाळ्यात 40-43 डीग्री से.ग्रे तापमानात रेशीम किटक संगोपन घेतले जात नाही. परंतु तापमान कमी करण्याच्या सर्व उपाययोजना करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यासाठी संगोपन गृहाच्या नेटला पोते बांधून ड्रीपच्या पाईपने पाणी सोडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी गणेश उर्फ राजू नरहरी ठाकरे यांनी संगोपन गृहाशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर सिंटेक्स टाकी चढवली व त्यातून ठिबकच्या पाईपद्वारे पाणी पोत्यांवर सोडले. पूर्ण संगोपन होईपर्यंत 30 ते 33 सें.ग्रे. तापमान कायम राखले. बुलडाणा येथील जगदीश गुळवे यांच्‍या कडून बाल किटक (चॉकी म्हणजे दोन अवस्था पूर्ण झालेले रेशीम कीटक) घेतले. त्यानंतर प्रौढ किटक संगोपन 15 ते 20 दिवसांचे ऐन उन्हाळ्यात सुरू केले. वेळोवेळी रेशीम कार्यालयाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. सर्वांनी अतिशय मेहनतीने, जिद्द व चिकाटीने किटक संगोपन पूर्ण केले. सर्वांचे रेशीम कोष तयार झाले असून कोष विक्रीसाठी 15 दिवसांत तयार झाले आहेत. उन्हाळ्यात कोष उत्पादन कमी होत असल्याने रेशीम कोषाचे दर वधारले आहेत. त्याचा फायदा नक्कीच या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना होईल. अंदाजे 650 ते 700 किलो ग्रॅम कोष उत्पादन झाले आहे. या यशस्वी संगोपनाचे श्रेय ते महेंद्र ढवळे (सहायक संचालक, विभागीय कार्यालय, अमरावती) यांना देतात. तसेच मनरेगा अंतर्गत वेळोवेळी सहकार्य केल्याबाबत मेहकरचे तहसीलदार डॉ. गरकल, कोरोना काळातही प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देउन मार्गदर्शन केल्याबद्दल सु.प्र. फडके, रेशीम विकास अधिकारी यांना देतात.