मेहकर बाजार समितीचे संचालक पुंजाजी कान्‍हेंचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्‍यू

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजोबा बनल्याच्या आनंदात मुलगी आणि नातवाला पाहून सासरवाडीला निघालेले मेहकर बाजार समितीचे शिवसेना संचालक पुंजाजी नारायण कान्हे (48) यांच्यावर काल, 6 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास काळाने घाला घातला. रस्त्यावरील छोट्या नाल्यावरून पाणी वाहत असताना त्यातून दुचाकी निघण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. ही घटना सावरखेडजवळ (ता. चिखली) घडली. काल …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आजोबा बनल्याच्‍या आनंदात मुलगी आणि नातवाला पाहून सासरवाडीला निघालेले मेहकर बाजार समितीचे शिवसेना संचालक पुंजाजी नारायण कान्हे (48) यांच्‍यावर काल, 6 जूनला रात्री साडेआठच्‍या सुमारास काळाने घाला घातला. रस्‍त्‍यावरील छोट्या नाल्यावरून पाणी वाहत असताना त्‍यातून दुचाकी निघण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. ही घटना सावरखेडजवळ (ता. चिखली) घडली.

काल बुलडाणा येथे पुंजाजी कान्‍हे यांच्‍या मुलीची डिलिव्‍हरी झाली होती. नातवाला पाहण्यासाठी श्री. कान्‍हे मोटारसायकलने गेले होते. मंगरूळ नवघरकडे परतताना घर कुणी नसल्याने त्‍यांनी सासरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला. सावरखेडहून डोंगरगावकडे जात असताना सावरखेडजवळच एक छोटा नाला ओसंडून वाहत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने कान्‍हे यांनी दुचाकी त्‍यावरून नेण्याचा प्रयत्‍न केला. इथेच घात झाला. दुचाकी वाहून जात त्‍यांचाही यात मृत्‍यू झाला. आज, 7 जूनला ही घटना समोर आली. कान्‍हे यांच्‍या पश्चात पत्‍नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. शिवसेना आमदार संजय रायमूलकर, मेहकर बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे, सचिव संजय बार्डेकर, संचालक राजू चव्हाण यांच्‍यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी या घटनेबद्दल शोक व्‍यक्‍त केला आहे.