मोठे संकट टळले!! त्या दोघांना नवीन व्हायरसची लागण नाही; प्रशासनासह आरोग्य यंत्रणांनी सोडला सुटकेचा श्‍वास

बुलडाणा (संजय मोहिते) ः इंग्लंड येथून खामगाव येथे परतलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या दोन रुग्णांचे अहवाल अखेर प्राप्त झाले असून, त्यांना यूकेमध्ये आढळलेल्या नवीन व्हायरसची लागण झाली नसल्याचे वृत्त आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांनी अक्षरशः सुटकेचा श्वास सोडला आहे. याचबरोबर जिल्ह्यावरील मोठे संकट टळले आहे. सरत्या वर्षात इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्याने भारतासह …
 

बुलडाणा (संजय मोहिते) ः इंग्लंड येथून खामगाव येथे परतलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या दोन रुग्णांचे अहवाल अखेर प्राप्त झाले असून, त्यांना यूकेमध्ये आढळलेल्या नवीन व्हायरसची लागण झाली नसल्याचे वृत्त आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांनी अक्षरशः सुटकेचा श्‍वास सोडला आहे. याचबरोबर जिल्ह्यावरील मोठे संकट टळले आहे.

सरत्या वर्षात इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्याने भारतासह जगात खळबळ उडाली. यामुळे केंद्र सरकारने इंग्लंडहून येणारी विमानसेवा बंद केली. मात्र त्यापूर्वी भारतात व जिल्ह्यात इंग्लंडचे प्रवासी दाखल झाले. यामध्ये मलकापूर येथे 4, शेगाव मध्ये 1, सिंदखेडराजा त 1 तर खामगावात 2 प्रवासी दाखल झाले होते. खामगावातील दोघे जण नंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन अलर्ट झाले. या दोघांचे स्वॅब नमुने व जेनेटिक नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा संस्थेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या अहवालातून त्यांना कोणत्या विषाणूची किंबहुना इंग्लंडमधील विषाणूची बाधा आहे का हे स्पष्ट होणार असल्याने अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र सुदैवाने त्यांचे अहवाल दिलासादायक आले. त्यांना त्या नवीन विषाणू (स्ट्रेन)ची लागण झाली नसल्याचे आज, 4 जानेवारीला संध्याकाळी स्पष्ट झाले. यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्‍वास सोडला आहे.