मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानात कोतवालाने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण चिठ्ठीत?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळ्याचे तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या शासकीय निवासस्थानात कोतवालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, 27 जून रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास समोर आली. विष्णू शंकर सुरपाटणे (44, रा. मोताळा) असे आत्महत्या केलेल्या कोतवालाचे नाव आहे. विष्णू सुरपाटणे हे मोताळा तहसील कार्यालय व कार्यालय परिसरातच असणाऱ्या तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानाची देखरेखीचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोताळ्याचे तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या शासकीय निवासस्थानात कोतवालाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची खळबळजनक घटना आज, 27 जून रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास समोर आली. विष्णू शंकर सुरपाटणे (44, रा. मोताळा) असे आत्महत्या केलेल्या कोतवालाचे नाव आहे.

विष्णू सुरपाटणे हे मोताळा तहसील कार्यालय व कार्यालय परिसरातच असणाऱ्या तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानाची देखरेखीचे काम करायचे. आज रविवारची सुटी असल्याने तहसील कार्यालय परिसरात वर्दळ नव्हती. दुपारी 3 च्या दरम्यान सुरपाटने यांनी सहकाऱ्यांसोबत चहापाणी सुद्धा घेतले होते. सायंकाळी त्यांचा फोन लागत नसल्याने सुरपाटणे यांचा मुलगा त्यांना शोधायला तहसीलदारांच्या निवासस्थानी पोहोचला. शासकीय निवासस्थानातील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात येताच दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विष्णू सुरपाटणे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

या प्रकरणाची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी सुरपाटणे यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून, या चिठ्ठीचा खुलासा करण्यास तूर्त पोलिसांनी तपासाच्‍या कारणास्‍तव नकार दिला आहे. त्‍यामुळे या चिठ्ठीविषयीची उत्‍सुकता वाढली आहे. त्‍यातच सुरपाटणे यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण दडलेले असल्याने पोलीस तपासात नक्‍की काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज रविवार असल्याने तहसीलदार समाधान सोनवणे कुटुंबासह बाहेरगावी होते. घटनेची माहिती त्यांना मिळताच ते परत येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.