मोताळा पंचायत समिती सभापतीचा 15 फेब्रुवारीला फैसला, इच्छुकांची जोरदार फिल्डिंग, पदासाठी ओपन स्पर्धा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मोताळा पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच आरक्षण सर्व साधारण असल्याने सर्वच सदस्य विजयासाठी दावेदार ठरले आहेत. यामुळे या मानाच्या पदासाठी यंदा कमालीची चुरस राहणार आहे.यापूर्वी सभापती कैलास गवई यांनी वैयक्तिक कारणावरून मागील 27 जानेवारी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मोताळा पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच आरक्षण सर्व साधारण असल्याने सर्वच सदस्य विजयासाठी दावेदार ठरले आहेत. यामुळे या मानाच्या पदासाठी यंदा कमालीची चुरस राहणार आहे.
यापूर्वी सभापती कैलास गवई यांनी वैयक्तिक कारणावरून मागील 27 जानेवारी 2021 रोजी पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांच्याकडे सादर केला होता. अध्यक्षांनी तात्काळ म्हणजे 28 जानेवारीलाच राजीनामा मंजूर करून टाकला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. यामुळे निवडणूक कधी जाहीर होते याकडे पंचायत समिती सदस्यांसह तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. आज 9 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली. यानुसार येत्या 15 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान मुहूर्त जाहीर होताच अगोदरच सुरू असलेल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण ओपन असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. 8 सदस्यीय समितीचे सभापती पद भूषविल्याने गवई आता स्पर्धेत राहणार नाहीत. उर्वरित 7 पैकी सरस्वती मोरे, धीरेंद्र देशमुख, उज्ज्वला चोपडे, राजेश्‍वरी परमार यांना जास्त संधी असल्याचे मानले जात आहे.
असा आहे कार्यक्रम
दरम्यान, पीठासीन अधिकारी म्हणून मोताळा तहसीलदारांची नियुक्ती जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे. निवडीसाठी पंचायत समितीत 15 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता सभा लावण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. सभा सुरू झाल्यावर प्रारंभी छाननी व माघारीसाठी वेळ राहणार असून नंतर सभेला सुरुवात होणार आहे. आवश्यकतेनुसार मतदान घेण्यात येणार आहे.