मोताळ्यात पुन्‍हा मोठी चोरी!; किराणा दुकान फोडून लाखाचा माल पोतडीत भरून नेला!

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापारी, व्यावसायिक हैराण असताना त्यात चोरट्यांनी कहर केला आहे. मोताळा शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून, काल, 11 मार्चला सकाळीही आणखी एक चोरीची मोठी घटना समोर आली. आठवडी बाजार चौकातील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी 1 लाख रुपयांचा माल चोरून नेला. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आधी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्‍यापारी, व्‍यावसायिक हैराण असताना त्‍यात चोरट्यांनी कहर केला आहे. मोताळा शहरात वारंवार चोरीच्‍या घटना घडत असून, काल, 11 मार्चला सकाळीही आणखी एक चोरीची मोठी घटना समोर आली. आठवडी बाजार चौकातील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी 1 लाख रुपयांचा माल चोरून नेला. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्‍यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
रफीक खान (42) किराणा दुकान बंद करून 10 मार्चला सायंकाळी घरी गेले होते. 11 मार्चला सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकान फोडल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. चोरट्यांनी छतावरील टिनपत्र्याचा नटबोल्‍ट काढून दुकानात शिरून झेंडू बामचा एक बॉक्‍स, बिड्यांचे बॉक्‍स असा एकूण 1 लाख 1 हजार 160 रुपयांचा माल चोरून नेला. दुकानाच्‍या मागील एका किराणा दुकानाबाहेरील सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला असून, यात पहाटे सव्वा तीनच्‍या सुमारास चोरटा पोतडीत सामान भरून नेताना दिसत आहे. गेल्याच महिन्यात याच दुकानासमोरील मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी 5 लाख रुपयांचा माल चोरून नेला होता. ते चोरटे अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. दुसरीकडे वाढत्‍या चोरीच्‍या घटनांनी दुकानदार, व्‍यावसायिक हैराण असून, रात्रीची गस्‍त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.