मोबाइल पाहू नको अभ्यास कर म्हटले… मुलाने कुऱ्हाडीने केला वडिलांचा खून!; मेहकर शहरातील धक्‍कादायक घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जास्त मोबाइल बघू नको, अभ्यास कर… असे म्हटल्याने राग आलेल्या मुलाने वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील समतानगर भागात काल, 29 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली. गजानन संपत गवई (55, रा. समतानगर मेहकर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जास्त मोबाइल बघू नको, अभ्यास कर… असे म्‍हटल्‍याने राग आलेल्या मुलाने वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील समतानगर भागात काल, 29 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली. गजानन संपत गवई (55, रा. समतानगर मेहकर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, समतानगरात राहत असलेले गजानन संपत गवई अमडापूर येथे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. घरात नवरा, बायको व २१ वर्षीय मुलगा शुभम राहतात. शुभम हा औरंगाबाद येथे इंजिनिअरिंगच्‍या दुसऱ्या वर्षाला आहे. काल रात्री गजानन गवई आराम करत असताना शुभमने रागाच्या भरात कुऱ्हाडीचे वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जातो म्हणून घरातून बाहेर पडला. शेजारच्या मंडळींनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक विजय घुले, गणेश लोढे ,उमेश घुगे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी शुभमशी संपर्क केला असता तो पोलीस स्टेशन परिसरात फिरकत होता. त्यास ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम मानसिक रुग्ण असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आई- वडिलांनी अभ्यास कर, मोबाइल कमी बघ असे म्हटले की चिडचिड करायचा. काल रात्री शुभमला वडील गजानन गवई यांनी अभ्यास कर मोबाइल खेळू नको म्हणून हटकल्‍याचा राग येऊन त्‍याने वडिलांचा खून केला. गजानन गवई यांना शुभम हा मुलगा, पत्‍नी व चार मुली असून त्या विवाहित आहेत. मेहकर पोलिसांनी शुभमला अटक केली असून हत्या करताना वापरलेली कुऱ्हाड जप्त केली. शुभमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईनेच दिली तक्रार
याप्रकरणी स्वतःच्या मुलाविरोधात गजानन गवई यांची पत्‍नी आणि शुभमची आई सौ.आशाबाई गजानन गवई यांनी तक्रार दिली आहे.