यंदा थंडीचा मुक्काम 26 फेब्रुवारीपर्यंत, 150 रुपयांत शिका पाऊस पाडण्याचे तंत्र

हिवरा आश्रम ः हवामानआधारित शेती करणे सध्याची गरज असून, शेतकर्यांनी निसर्गाला चकवा देऊन शेती करणे शिकले पाहिजेत, असा सल्ला देतानाच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेती करताना भेडसावणार्या अडचणी आणि त्यावर कशा प्रकारे मात करायची याचे विस्तृत विवेचन केले. चक्रीवादळापासून तर पाऊस कसा मोजायचा आणि यशस्वी पेरणी कधी- कशी करायची याचा कानमंत्र त्यांनी शेतकर्यांना समजेल …
 

हिवरा आश्रम ः हवामानआधारित शेती करणे सध्याची गरज असून, शेतकर्‍यांनी निसर्गाला चकवा देऊन शेती करणे शिकले पाहिजेत, असा सल्ला देतानाच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेती करताना भेडसावणार्‍या अडचणी आणि त्यावर कशा प्रकारे मात करायची याचे विस्तृत विवेचन केले. चक्रीवादळापासून तर पाऊस कसा मोजायचा आणि यशस्वी पेरणी कधी- कशी करायची याचा कानमंत्र त्यांनी शेतकर्‍यांना समजेल अशा भाषेत सांगितला. निमित्त होते विवेकानंद महोत्सवातील त्यांच्या व्याख्यानाचे.
हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील प. पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात 2 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता 4 फेब्रुवारीला झाली. शेवटच्या दिवशी दुपारी दोनला श्री. डख यांचे व्याख्यान झाले. तब्बल दीड तास त्यांनी मार्गदर्शन केले. देशातील तब्बल 3 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना संदेश पाठवून श्री. डख हवामानाबद्दल जागरूक करत असतात. नुकसान टाळण्यासाठी हवामानासंबंधित मेसेज करून ते शेतकर्‍यांना 15 दिवस आधीच अलर्ट करतात. 1 वर्षापर्यंतचे ते अंदाज देतात. यावेळी बोलताना श्री. डख यांनी सांगितले, की खडकाळ, डोंगराळ, तळ्याच्या परिसरात, धरणाच्या परिसरात गारपीट होण्याची शक्यता असते. काळी जमीन ज्या भागात असते त्या भागात गारपीट होत नाही. गारपिटीला घाबरून जाण्यापेक्षा या संकटाला तोंड देण्याचे धारिष्ट्य शेतकर्‍यांनी ठेवले पाहिजेत, असे ते म्हणाले.
यंदा थंडी 26 फेब्रुवारीपर्यंत
वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून यंदा थंडी अधिक काळ राहणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा मुक्काम राहील. सध्याचे ढगाळ वातावरण 7 तारखेपर्यंत राहणार असून, त्यानंतर थंडी पुन्हा जाणवायला सुरुवात होईल. 11 फेब्रुवारीनंतर उन्हाचा पारा दिवसा वाढलेला तर रात्री थंडी वाढलेली असेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
विजा पडत असतील तर…
दरवर्षी अनेक शेतकरी विज पडून मृत्यूमुखी पडतात. अनेकांचे नुकसानही होते. विजांपासून संरक्षणासाठी श्री. डख यांनी व्याख्यानात उपाय सूचवला. त्यांनी सांगितले, की 15 ते 30 मेदरम्यान अवकाळी पाऊस होत असतो. हा पाऊस सुरू झाला आणि विजा चमकू लागल्या की शेतकर्‍यांनी सरळ घराचा रस्ता धरावा. शेतात झाडाखाली विशेष करून हिरव्या झाडाखाली थांबू नये. जनावराजवळही थांबू नये, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
असा मोजा घरीच पाऊस
श्री. डख यांनी पाऊस मोजण्याचे अजब तंत्र यावेळी सांगितले. त्यांनी सांगितले, की शेतातून पाणी बाहेर वाहू लागले की समजावे की 20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. नाल्यात गुडघ्याइतके पाणी वाहू लागले की 30 मि.मी. पाऊस झाला.
पाऊस पाडण्याचा दिला मंत्र
अवघ्या दीडशे रुपये खर्चून तयार करण्यात येणार्‍या तंत्राचा मंत्र श्री. डख यांनी दिला. ते म्हणाले, की 50 किलो खडेमीठ, 20 किलो जळतण, चीक असलेली पाने, 20 लिटरची लोखंडी पाण्याची टाकी या तंत्रासाठी हवे. जळतण जाळून त्यात हळूहळू मीठ आणि एकाचवेळी पाने टाकावीत. यातून जो दाट धूर निर्माण होतो आणि मीठाची वाफ होऊन आकाशात जाते यामुळे पाऊस हमखास पाऊस होतो, असा दावाही त्यांनी केला.
जास्त आंबे खाल तर…
जास्त आंबे खायला ज्या हंगामात मिळतील त्या हंगामात पाऊस कमी होतो, असे अजब तर्कटही त्यांनी मांडले. हवामानातील अभ्यासूपणाचा कस लावून त्यांनी हे तर्कट मांडले. त्यांनी सांगितले, की ज्या हंगामात आंब्याचे उत्पादन कमी होते त्या हंगामात जास्त पाऊस होतो. उत्पादन जास्त तर पाऊस कमी, असे ते म्हणाले. सध्या आंब्याला चांगला फुलोरा आहे. यंदा चांगले आंबा उत्पादन झाले तर पाऊस कमी येणार, असा इशाराही त्यांनी मांडला. याशिवाय पाऊस कमी- जास्त कधी आणि कसा होतो, याबद्दलही त्यांनी अनेक कल्पना दिल्या.