याला म्‍हणतात प्रेम… चोरांनी चोरून नेल्या… त्‍या दावं तोडून पुन्हा घरी आल्या…!; लोणारमधील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाळीव प्राण्यांवर प्रेम केलं की तेही आपल्यावर भरभरून प्रेम करतात. त्यांनाही जणू आपला जिव्हाळा लागतो. पण काही विघ्नसंतोषी लोकांची नजर कधी कधी या जिव्हाळ्याला लागते. पण या प्राण्यांचं प्रेम इतकं असतं की, ते पुन्हा आपल्याकडे सुखरुप परत येण्यासाठी धडपडतात…असे एक उदाहरण लोणारमध्ये समोर आले आहे. तीन म्हशी चोरांनी चोरून नेल्या. …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाळीव प्राण्यांवर प्रेम केलं की तेही आपल्यावर भरभरून प्रेम करतात. त्‍यांनाही जणू आपला जिव्हाळा लागतो. पण काही विघ्नसंतोषी लोकांची नजर कधी कधी या जिव्हाळ्याला लागते. पण या प्राण्यांचं प्रेम इतकं असतं की, ते पुन्‍हा आपल्याकडे सुखरुप परत येण्यासाठी धडपडतात…असे एक उदाहरण लोणारमध्ये समोर आले आहे. तीन म्‍हशी चोरांनी चोरून नेल्या. पण त्‍यातील दोन म्‍हशी दावं तोडून पुन्हा आपल्या घरी सुखरुप परत आल्या… आता पोलिसांसमोर तिसऱ्या म्‍हशीचा शोध लावण्याचे आव्हान आहे.

महेश इरतकर आणि राजू इरतकर या कुटुंबातील तीन म्‍हशी १३ जुलैला रात्री १० ते १२ च्‍या दरम्‍यान चोरीस गेल्या. या तिन्‍ही म्‍हशींचा जन्म इरतकर यांच्‍याकडे झालेला. त्‍यामुळे लहानपणापासून या कुटुंबातच त्‍या मोठ्या झाल्या. साहाजिकच जिव्हाळा निर्माण झालेला. या कुटुंबाचे या म्‍हशींवर अतोनात प्रेम… त्‍यामुळे म्‍हशी चोरी गेल्याचे पाहून कुटुंब हादरून गेले. सगळीकडे सोशल मीडियावर त्‍यांनी मेसेज टाकले. म्‍हशी कुठे दिसल्या तर सांगा असे आर्जव घातले. इकडे कुटुंबांची तगमग सुरू असताना कदाचित तिकडे म्‍हशींचीही तीच गत झाली असावी. आपले मालक दिसत नसल्याने कावऱ्याबावऱ्या होऊन त्‍यांनी थेट दावेच तोडले आणि घराचा रस्ता धरला.. बरं या मुक्या प्राण्यांना घराचा रस्ता तरी कसा माहीत असेल..? कदाचित चोर चोरून नेत असताना त्‍यांनी रस्ताही लक्षात ठेवला असेल का..? शेवटी आपलं घर कुणी विसरतं का? एकवेळ माणूस विसरेल पण पाळीव प्राणी आपले घर विसरत नाहीत असे म्‍हणतात. याची प्रचिती दिसून आली. सकाळीच हिरडव रोडच्‍या परिसरात या दोन म्‍हशी त्‍यातील एक १४ वर्षांची तर दुसरी ४ वर्षांची वगार दिसल्याची वार्ता कानी पडताच आनंदीत झालेल्या कुटुंबाने तातडीने हिरडव रोड गाठला.. आपल्या म्‍हशींना पाहून त्‍यांचाही ऊर भरून आला.. पण तिसरी म्‍हैस दिसलेली नाही. पोलीस सकाळीच या कुटुंबियांना भेटून आले. त्‍यांनी आता तिसऱ्या सहा वर्षीय म्‍हशीला शोधण्याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. आपणासही कुठे ती तिसरी म्‍हैस (वगार) दिसली तर 8380820977 , 8806554071 या मोबाइलवर संपर्क करावा.