‘या’ तीन गावांत घराघरात रुग्ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना म्हटलं की आता अंगाचा थरकाप उडू लागलाय. शहरातला हा रोग कधी ग्रामीण भागात पसरला अन् घट्ट उभा राहिला हे कुणालाच कळलं नाही. गावात कुठे होतोय कोरोना म्हणून बेफिकीर होते, आज तेच वेळीच गंभीर न झाल्याचा पश्चाताप करत आहेत. चिखली तालुक्यातील 3 गावांत तर घरोघरी रुग्ण आहेत. सर्दी, ताप, खोकला, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना म्‍हटलं की आता अंगाचा थरकाप उडू लागलाय. शहरातला हा रोग कधी ग्रामीण भागात पसरला अन्‌ घट्ट उभा राहिला हे कुणालाच कळलं नाही. गावात कुठे होतोय कोरोना म्‍हणून बेफिकीर होते, आज तेच वेळीच गंभीर न झाल्‍याचा पश्चाताप करत आहेत. चिखली तालुक्‍यातील 3 गावांत तर घरोघरी रुग्‍ण आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे हे रुग्‍ण असले तरी, चाचणीसाठी मात्र ते धजावत नाहीत आणि यंत्रणा त्‍यांच्‍यापर्यंत चाचणीसाठी अजूनतरी आलेली नाही. मात्र चाचण्या झाल्याच तर यातील बहुतांश जण कोरोनाबाधित असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सवणा, मुरादपूर आणि शेळगाव आटोळ ही ती 3 गावे आहेत.

शेळगाव आटोळमध्ये सध्या कोरोनाचे 60 पेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण, मुरादपूर, सवण्यातही या वेगळे चित्र नाही. सवणा गावात 500 ते 700 जण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार आहेत. घराघरात अनेक जण बेडवर पडून आहेत. काळजी घ्यायला कुणीच नाही. काही घरांत तर सारेच आजारी आहेत. नातेवाइकांना बाहेरगावावरून बोलाविण्याचीही सोय नाही. कारण रक्‍ताची नातीही आता दूर दूर जात आहे. गावावर आजारांचे संकट आल्याचे पाहून अनेकांनी तातडीने आपले बिऱ्हाड शेतात थाटले आहे. अपुरी आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनचा तुटवडा, दवाखान्यात बेडची अपुरी व्यवस्था, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे आरोग्य यंत्रणा सुद्धा जिल्ह्यात कोलमडून पडल्‍यागत भयानक स्‍थिती आहे. त्यातच गावखेड्यामध्ये कोरोनाने ठाण मांडल्‍याचे दिसून येते. जिल्ह्यात एखाददुसरेच गाव असेल जिथे रुग्‍ण नाही.

शहरी भागांपेक्षा सध्या ग्रामीण भागातील रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत.आमच्याकडे दाखल होणारे 90 टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. गावांमध्ये सावडणे, अंत्यविधी, लग्‍न यासाठी लोक अजूनही गर्दी करतात. स्वतःहून टेस्ट करीत नाहीत. यामुळे परिस्थिती आणखी भयावह होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

– डॉ. पंढरी इंगळे, गंगाई हॉस्पिटल, चिखली

40 टेस्टपैकी 15 पॉझिटिव्ह

 ग्रामीण भागात कोविड तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा अधिक असल्याचे चित्र समोर येत आहेत. अमोना येथे 40 जणांची तपासणी केली असता त्यापैकी 15 जण रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले.