रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या कुटुंबावर चढली रुग्‍णवाहिका!; पती-पत्‍नी ठार, तिघे गंभीर, बुलडाण्यातील थरारक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टायर फुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या कुटुंबावर चढली. यात 1 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती अत्यावस्थ आहे. ही खळबळजनक घटना आज, 17 मार्चच्या पहाटे 12 ते 1 वाजेदरम्यान बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकात घडली.अनिल गंगाराम पडळकर (33) व मायाबाई अनिल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः टायर फुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या कुटुंबावर चढली. यात 1 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती अत्‍यावस्‍थ आहे. ही खळबळजनक घटना आज, 17 मार्चच्‍या पहाटे 12 ते 1 वाजेदरम्यान बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकात घडली.अनिल गंगाराम पडळकर (33) व मायाबाई अनिल पडळकर (30, दोघे रा. पारधी बाबा मंदिराजवळ, चिखली) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत.

त्रिशरण चौकात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पाल टाकून विळे, कुऱ्हाडी, पाटा,लोखंडी तवे विक्रीचा व्यवसाय करणारे लोक राहतात. रात्री हे सर्व जण झोपलेले असताना भरधाव रुग्णवाहिकेचे (MH 28-B 7136) टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रुग्णवाहिका थेट त्‍यांच्‍यावर चढली. यात अनिल पडोळकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर बेबीबाई शेषराव सोळंके (35), शेषराव लक्ष्मण सोळंके (40), मायाबाई अनिल पडळकर (30), आकाश अनिल पडळकर (4) गंभीर जखमी झाले. जखमींवर बुलडाणा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अकोला येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान मायाबाई अनिल पडळकर यांचाही आज सकाळी 10 च्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय सुधाकर गवारगुरू, पोहेकाँ प्रशांत शास्त्री, माधव पेटकर, ना.पो.काँ. श्री. पिंपळे, अमोल खराडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. ही खासगी रुग्णवाहिका कोलवड येथील योगेश पुंजाजी जाधव यांची असल्याचे निष्पन्‍न झाल्याने रुग्णवाहिका व जाधव यांना ताब्यात घेतले आहे. रुग्‍णवाहिका लोणार येथून बुलडाण्याकडे परतताना हा अपघात झाल्‍याचे सूत्रांचे म्‍हणणे आहे.

4 वर्षांचा आकाश झाला पोरका

पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर संसार थाटला. मात्र काळरात्रीने या संसार रथाची दोन्ही चाके असलेल्‍या पती- पत्नीचा मृत्यू झाला. त्यांच्‍या चिमुकल्‍या 4 वर्षीय आकाशवर अकोला येथे उपचार सुरू आहेत. या अपघाताने तो पोरका झाला.