रस्‍त्‍याच्‍या कडेला दुचाकी थांबवून मोबाइलवर बोलतानाच काळाचा घाला; पिकअपने उडवले, युवक जागीच ठार, दुसरबीड येथील घटना

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः चालकाचा भरधाव पिकअप वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. ही घटना तालुक्यातील दुसरबीड येथे आज, 13 एप्रिलला दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिकअप चालकाला किनगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरबीड येथील हॉटेल इंडियन धाब्यावर काम करणारा युवक अमोल रामदास जाधव (२५, रा. केशव …
 

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः  चालकाचा भरधाव पिकअप वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. ही घटना तालुक्यातील दुसरबीड येथे आज, 13 एप्रिलला दुपारी चारच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी पिकअप चालकाला किनगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुसरबीड येथील हॉटेल इंडियन धाब्यावर काम करणारा युवक अमोल रामदास जाधव (२५, रा. केशव शिवणी) हा दुचाकीने (क्र. एमएच २१ यू ६१६६) दुसरबीड गावातून भाजीपाला घेऊन धाब्याकडे परत चालला होता. त्याचवेळी त्याला भ्रमणध्वनी आल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून तिला टेकून बोलत उभा होता. त्याचवेळी जालनाकडून मेहकरकडे द्राक्ष घेऊन भरधाव जाणाऱ्या पिकअपने (क्र. एमएच २८ एबी ५५४६) रस्त्याच्या कडेला जात अमोल जाधव व त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. पिकअपने समोर उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर चारचाकीला देखील धडक मारली व त्यानंतर पिकअप उलटले. या अपघातात अमोल रामदास जाधवचा जागीच मृत्यू झाला असून, किनगावराजा पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे.