राज्यातील घडामोडींमुळे काँग्रेस, शिवेसेनेत नाराजी

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना एक व इतरांना दुसरा न्याय का?; वादांचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याची चिंता मुंबई : परमबीरसिंग यांचा लेटरबॉम्ब, मनसुख हिरेन हत्याप्रकरण, एन्टिलिया स्फोटके व सचिन वाझे प्रकरण या सर्वांचा परिणाम महाविकास आघाडीच्या प्रतिमेवर होताना दिसत असून त्यात ठाकरे सरकारवरील टीकेचे वर्तुळ वरचेवर वाढत चालले आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत सहभागी पक्षांची नाराजी …
 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना एक व इतरांना दुसरा न्याय का?; वादांचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याची चिंता

मुंबई : परमबीरसिंग यांचा लेटरबॉम्ब, मनसुख हिरेन हत्याप्रकरण, एन्टिलिया स्फोटके व सचिन वाझे प्रकरण या सर्वांचा परिणाम महाविकास आघाडीच्या प्रतिमेवर होताना दिसत असून त्यात ठाकरे सरकारवरील टीकेचे वर्तुळ वरचेवर वाढत चालले आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत सहभागी पक्षांची नाराजी वाढताना दिसून येत असून शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसत आहे. परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचे टार्गेट दिल्याचा थेट आरोप केला. त्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याचे संकेत मिळाले.पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जोरदार डॅमेज कंट्रोल अभियान राबवत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी ही बदललेली भूमिका काँग्रेस व शिवसेना नेत्यांनाही पटवून दिली.परिणामी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे सांगत भाजपवरच प्रत्यारोप केले.या सर्वांचा कर्ताकरविता भाजपच असल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपनेही इरेला पेटत देशमुख यांच्याविरोधात आणखी पुरावे सादर करत राष्ट्रवादी काँग्रेसला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला.या सर्व घडामोडींमुळे काँगेस व शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता व्यक्त होत आहे. या घडमोडींवर विचार करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यात सद्यस्थितीचा काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रतिमेवर होत असलेला परिणाम यावर चर्चा होणार असल्याचे समजते. ठाकरे सरकारवर झालेल्या आरोपांमुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे. शिवाय महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होत असून काँग्रेस व शिवसेनेच्या वाट्याला नुकसान येत आहे. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या खात्यांना निधी मिळताना दूजाभाव होणे, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यावर त्यांचे राजीनामे न घेणे व शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा घेणे अशा गोष्टींमुळे शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे समजते. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे, अनिल देशमुखांचा ते आरोप असल्याचे सांगून बचाव केला. पण मग शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला? असा प्रश्न दोन्ही पक्षपातळीवर चर्चिला जात आहे. अशीच स्थिती राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ होईल व शिवसेना, काँग्रेस दुबळी होईल, असा सूर काही नेत्यांनी लावला आहे.परमबीरसिंग यांचे प्रकरण जास्त ताणले गेले व देशमुख यांचा राजीनामा न घेतला गेल्यास त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या स्थैर्य व भवितव्यावर होण्याची शक्यताही राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.