राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षा न घेताच पास

शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पास करून पुढील वर्षात पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून संवाद साधत याची माहिती …
 

शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पास करून पुढील वर्षात पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून संवाद साधत याची माहिती पालकांना दिली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न होता पास होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे, हे विशेष !
कोरोनाच्या पार्श्वभूमीव गतवर्षी मार्चमध्ये सर्व शाळांना सुटी देण्यात आली. त्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळांचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होऊ शकले नाहीत. मुलांचे सर्व शिक्षण व क्लासेस जवळपास ऑनलाईनच पार पडले. प्रथम सत्र व घटक चाचणी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेऊन मुलांचे थोडेफार मूल्यमापन झाले. परंतु ग्रामीण भागात त्यात इंटरनेटसह इतर अनेक अडचणी आल्या. परिणामी संपूर्ण वर्षभर शालेय शैक्षणिक सत्र विस्कळीतच राहिले. आता राज्यात कोरोनाचा संसर्ग आणि उद्रेक पुन्हा वाढला आहे. शिवाय नव्या संसर्गात लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलांचा जीव धोक्यात न घालता मुलांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवले जाणार आहे. पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन चाचणीच्या आधारे जाहीर केला जातो. पण सध्या दहावी- बारावीच्या परीक्षाच होणे अद्याप बाकी आहे. शिवाय ग्रामीण भगात शिक्षक मंडळी कोरोनाचे सर्वेक्षण करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे ते मुलांच्या परीक्षेसाठी वेळ देऊ शकणार नाहीत.या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्वाचा मानला जातो आहे.