रातराणी बंद झाल्‍याने बुलडाण्यावरून पुण्याला जाणाऱ्यांत नाराजी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा ते पुणे ही रातराणी एसटी बस बंद झाल्याने बुलडाण्यावरून पुण्याला जाणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी, नोकरदार मंडळी मोठ्या प्रमाणावर या बसने प्रवास करत होती. अचानक बस बंद केल्याने त्यांना अन्य पर्याय अवलंबावे लागत असून, ही बाब खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या पथ्यावर पडली आहे. मात्र एसटीचे नुकसान होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा ते पुणे ही रातराणी एसटी बस बंद झाल्याने बुलडाण्यावरून पुण्याला जाणाऱ्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. विद्यार्थी, नोकरदार मंडळी मोठ्या प्रमाणावर या बसने प्रवास करत होती. अचानक बस बंद केल्याने त्‍यांना अन्य पर्याय अवलंबावे  लागत असून, ही बाब खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्‍या पथ्यावर पडली आहे. मात्र एसटीचे नुकसान होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक जण व्‍यवसाय, नोकरी, शिक्षणानिमित्त पुण्याशी जोडले गेलेले आहेत. त्‍यांच्‍यासाठी ही बस सोयीची होती. रात्रीतून प्रवास घडत असल्याने दुसऱ्या दिवशी ते आपापल्या कामाला लागू शकत होते. मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून ही बस एसटीने बंद केली आहे. त्‍यामुळे प्रवाशी नाराजी भावना व्‍यक्‍त करत आहेत. बुलडाण्यावरून रात्री पावणेआठला मलकापूर- पुणे ही गाडी आहे. मात्र ती मलकापूरवरूनच भरून येते. त्‍यामुळे बुलडाण्याच्‍या प्रवाशांना त्‍यात जागा नसते. आधीची बुलडाणा -पुणे बस बुलडाण्यावरून सव्वानऊला निघायची. दुसऱ्या दिवशी सकाळीच शिवाजीनगर (वाकडेवाडी बसस्‍थानक) पोहोचायची. ही बाब तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी एसटीच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.