रात्री धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांना शेगाव पोलीस गांभीर्याने कधी घेणार?; काल रात्री दाम्‍पत्‍याला दारूड्याकडून मर्डरची धमकी!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन मध्येही शेगाव शहरात टवाळखोरांचा हैदोस सुरूच आहे. त्यांना चाप लावण्यास शहर पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. मध्यरात्रीपर्यंत या टवाळखोरांचा धिंगाणा सुरू असतो. 4 मे रोजी रात्री नशेत धुंद तीन टवाळखोरांनी एका नागरिकाला मारहाण केली होती. तसाच प्रकार पुन्हा समोर आला असून, रस्त्यावर कायम धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोराने …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन मध्येही शेगाव शहरात टवाळखोरांचा हैदोस सुरूच आहे. त्‍यांना चाप लावण्यास शहर पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. मध्यरात्रीपर्यंत या टवाळखोरांचा धिंगाणा सुरू असतो. 4 मे रोजी रात्री नशेत धुंद तीन टवाळखोरांनी एका नागरिकाला मारहाण केली होती. तसाच प्रकार पुन्‍हा समोर आला असून, रस्‍त्‍यावर कायम धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोराने काल, 12 मे रोजी रात्री साडेअकराच्‍या सुमारास मोदीनगरात एका दाम्‍पत्‍याला अश्लील शिविगाळ करत मर्डर करण्याची धमकी दिली.

चौकात जमून, दुभाजकावर बसून दारू पिणे, येणाऱ्या जाणाऱ्या शिविगाळ करणे, रहिवाशांचा उद्धार करणे या टवाळखोरांच्‍या कारनाम्यांमुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत. गेल्‍या आठवड्यात बाळापूर रोडवरील भुतबंगला परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर रमेश नेमाडे (24) यांना नागेश गावंडे (रा. संगमनगर, शेगाव) व त्‍याच्‍या 3 मित्रांनी मारहाण करत डोक्‍यात दारूची बाटली घातली होती. त्‍यानंतर काल आणखी एका दारूड्याचा कारनामा समोर आला आहे. गणेश बुडुकले नावाचा दारूडा रस्‍त्‍यावर उभा राहून मोदीनगरमध्ये मोहोल्यातील लोकांना शिविगाळ करत असतो. काही दिवसांपूर्वी त्‍याला सचिन शिंदे यांनी टोकले होते. तेव्हापासून तो सचिन आणि त्‍याच्‍या बायकोला शिविगाळ करत असतो. काल, 12 मे रोजी रात्री 11.30 वाजता सचिन व त्‍यांच्‍या पत्‍नीला घरासमोर उभे राहून गणेश बुडुकले अश्लील भाषेत शिविगाळ करू लागला. तुझा आज मर्डर करतो व मी जेल मध्ये जातो, अशी धमकीही त्‍याने दिली. गणेश बुडुकलेच्‍या त्रासामुळे सारेच वैतागलेले असल्याने आणि त्‍याच्‍या दहशतीमुळे कुणीच तक्रार करायला समोर येत नाही. मात्र त्रास असह्य झाल्याने सचिनची पत्‍नी सौ. आरती यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गणेशविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

रहिवाशी वैतागले, पोलीस कडक कारवाई करेनात…

दारू पिऊन लोकांना शिविगाळ करणे, धमक्‍या देणे हा गणेशचा रोजचाच शिरस्‍ता झाला आहे. कधी कधी शस्‍त्र घेऊन फिरत असल्याने एखाद दिवशी कुणाच्‍या जिवालाही धोका होऊ शकतो, अशी तक्रार रहिवाशांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना केली.