रेतीमाफियांमुळे ‘ते’ सरपंच, पोलीस पाटील येणार अडचणीत!; जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसंदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेता याकडे जिल्ह्यभरातील ग्राम दक्षता समित्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे अशा समित्यांसह सरपंच व पोलीस पाटील यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. यामुळे गावपातळीवरील या कारभाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसंदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेता याकडे  जिल्ह्यभरातील ग्राम दक्षता समित्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे अशा समित्यांसह सरपंच व पोलीस पाटील यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. यामुळे गावपातळीवरील या कारभाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाने सुधारित वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत गाव पातळीवर ग्राम दक्षता समित्या गठीत आल्या आहेत. सरपंच समितीचे अध्यक्ष असून, सचिव तलाठी, सदस्य ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि कोतवाल हे आहेत. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशवरून तहसीलदारांच्या पुढाकाराने या समित्या तयार करण्यात आल्या. मात्र याउप्परही रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन सर्रास सुरू असून यासंदर्भात मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच समित्या याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.  यामुळे या प्रकारांना आळा घालण्यास असमर्थ ठरणाऱ्या समित्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, तसेच सरपंच विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959, तर पोलीस पाटील विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1967 च्या कलम 9 नुसार कारवाई  करण्यात येणार आहे.