रेती चोरीचा थकीत करणारा कारनामा… चक्‍क बनावट पावत्‍या पोलिसांना दिल्या…चौकशीत वेगळेच सत्‍य समोर; दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल, १२ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्‍त; लोणार पोलिसांची कामगिरी

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बनावट पावती तयार करून चोरटी रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक लोणार पोलिसांनी जप्त केला असून, चालक व मालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई देऊळगाव कुंडपाळ शिवारातील रामकिसन गाढवे यांच्या शेताजवळ (ता.लोणार) ३ जुलैच्या रात्री करण्यात आली. सुरुवातीला पावत्या सादर केल्याने परवानगीने रेती वाहतूक होत असल्याचे पोलिसांनाही वाटले, मात्र …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बनावट पावती तयार करून चोरटी रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक लोणार पोलिसांनी जप्‍त केला असून, चालक व मालक दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई देऊळगाव कुंडपाळ शिवारातील रामकिसन गाढवे यांच्‍या शेताजवळ (ता.लोणार) ३ जुलैच्‍या रात्री करण्यात आली. सुरुवातीला पावत्‍या सादर केल्याने परवानगीने रेती वाहतूक होत असल्याचे पोलिसांनाही वाटले, मात्र पावत्‍या संशयास्पद भासल्याने त्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून पडताळणी केल्या असता, त्‍या बनावट असल्याचे समोर आले.

अक्षय राठोड आणि सोपान पंढरीनाथ केदार (रा. झोटिंगा, ता. सिंदखेड राजा) अशी आरोपींची नावे आहेत. त्‍यांच्‍या ताब्‍यातून १२ लाख रुपयांचा हायवा ट्रक आणि २४ हजार रुपयांची सहा ब्रास रेती जप्‍त करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरिक्षक शरद आहेर, पो.काँ. विशाल मधुकर धोंडगे, पो.काँ. खाडे हे ३ जुलैच्‍या रात्री पेट्रोलिंग करत होते. देऊळगाव कुंडपाळकडून चिंचोली सांगळे रोडने जाताना त्‍यांना देउळगाव कुंडपाळ शिवारात हायवा ट्रक संशयास्पदस्‍थितीत थांबलेला दिसला. त्‍यात सहा ब्रास आेली रेती होती. त्‍याचे मागचे दोन्ही टायर पंचर झालेले होते. सहायक पोलीस निरिक्षक शरद आहेर यांनी तिथेच या वाहनाचा पंचनामा केला. त्यानंतर ४ जुलैला दीपक सानप (रा. झोटिंगा) याने या वाहनाचा चालक अक्षय राठोड असल्याचे सांगून, त्या वाहनातील रेतीच्‍या वाहतुकीचे चार परवाने सादर केले. मात्र त्‍याच्‍यासोबत हायवाचालक-मालक हजर नसल्याने त्‍याला वाहन पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास सांगण्यात आले.

दीपकने सादर केलेले परवाने संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवान्यांची खात्री करून घेतली असता हे परवानेच बोगस निघाले. त्‍यावरील तारखांमध्ये तफावत होती. त्‍यामुळे हायवाचालक अक्षय राठोड व रेतीसाठा धारक सोपान पंढरीनाथ केदार (रा. झोटिंगा) यांनी आपसात संगनमत करून बनावट वाहतूक परवाने तयार करून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचे समोर आले. त्‍यामुळे या दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. आहेर करत आहेत.