रेती तस्करांची मुजोरी…!; चिखली नायब तहसीलदारांना धक्काबुक्की करून टिप्पर पळवले!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात रेती तस्करांची मुजोरी प्रचंड वाढली आहे. चिखलीत नायब तहसीलदारांना धक्काबुक्की, लोटपोट करून टिप्पर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल, ९ जुलैला रात्री साडेनऊच्या सुमारास चिखलीतील शासकीय विश्रामगृहासमोर घडली. माधव जेठे, उध्दव जेठे, योगेश जाधव यांच्यासह टिप्परचा …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात रेती तस्करांची मुजोरी प्रचंड वाढली आहे. चिखलीत नायब तहसीलदारांना धक्‍काबुक्की, लोटपोट करून टिप्पर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना काल, ९ जुलैला रात्री साडेनऊच्‍या सुमारास चिखलीतील शासकीय विश्रामगृहासमोर घडली.

माधव जेठे, उध्दव जेठे, योगेश जाधव यांच्‍यासह टिप्परचा क्लिनर व चालक अशा ५ संशयितांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. चिखलीचे नायब तहसीलदार डॉ. निकेतन भगवंतराव वाळे यांनी गेल्या काही दिवसांत अवैध रेती तस्‍कर आणि गौणखनिज तस्‍करांविरुद्ध कारवाया वाढवल्या आहेत. कालही ते व त्‍यांचे सहकारी तलाठी विनोद गिरी, योगेश भुसारी, अनिरुध्द खेडेकर, शासकीय वाहन चालक संतोष भोपळे विश्रामगृहासमोर गोपनीय माहितीवरून कारवाईसाठी थांबले होते. त्‍यांना देऊळगाव राजाकडून संशयित टिप्पर (क्र. MH-37-T-0248) येताना दिसले. या पथकाने टिप्पर थांबवून पाहणी केली असता चार ब्रास रेती दिसून आली. त्‍यांनी वाहनचालक व क्लिनर यांना रेतीच्‍या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्‍याने वैध वाहतूक परवाना अथवा राॅयल्टी नसल्याचे सांगितले. त्‍यांनी त्‍यांची नावेही सांगण्यास नकार दिला. त्‍यामुळे पथकाने त्‍यांचे फोन ताब्यात घेऊन वाहन तहसील कार्यालयाकडे घेण्यास सांगितले.

मात्र वाहनचालक व क्लिनर तिथून पळून गेले. त्यानंतर काहीच वेळात तिथे माधव जेठे, उध्दव जेठे व योगेश जाधव हे कारने आले. त्‍यांनी वाहन ताबडतोब सोडा अन्यथा परिणाम वाईट होतील, असे बोलून नायब तहसीलदारांना धक्काबुक्की करून लोटपाट केली. त्‍यांच्‍याकडील टिप्परची चावी व टिप्परचालकाचा मोबाइल हिसकावून घेतला. वाहन सोडले नाही तर पाहून घेईल, अशी धमकी दिली. माधव जेठे याने चालकाला परत बोलावून घेतले. नंतर हे सर्व जण टिप्पर घेऊन तिथून निघून गेले. नायब तहसीलदारांनी चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.