‘रेमडेसिव्हिर’ची विक्री आता मेडिकलमधून नाहीच! थेट रुग्णालयांना होणार पुरवठा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचा घटक व प्रचंड मागणी असलेल्या रेमडेसीविर औषधीचा काळाबाजार रोखण्यासाठी आता या इंजेक्शनची मेडिकल स्टोअर्समधून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. आता या औषधीचा पुरवठादाराकडून थेट कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणार आहे. यावर नियंत्रणासाठी 2 नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचा घटक व प्रचंड मागणी असलेल्या रेमडेसीविर औषधीचा काळाबाजार रोखण्यासाठी आता या इंजेक्शनची मेडिकल स्टोअर्समधून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. आता या औषधीचा पुरवठादाराकडून थेट कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणार आहे. यावर नियंत्रणासाठी 2  नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात या औषधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच कमीअधिक 1130 रुपये किंमत असलेल्या या औषधीची अलीकडे प्रचंड मागणी असल्याने बाजारात याची चढ्या भावाने विक्री, काळाबाजार देखील होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. यामुळे मध्यंतरी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी औषधी विक्रेत्यांच्या बैठक घेऊन त्यांना कमी मार्जिन( नफा) घेऊन या औषधीची विक्री करण्याची सूचना केली होती. मात्र तक्रारी कायम असल्याने अखेर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी  मेडिकलमधून होणाऱ्या विक्रीस मनाई केली आहे. त्याऐवजी थेट कंपन्या वा स्टॉकिस्टकडून कोविड रुग्णालयांना रेमडिसीविरचा पुरवठा करण्यात येणार आहे.  या पुरवठ्यावर देखरेख व सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून बुलडाणा एसडीओ राजेश्वर हांडे व अन्न औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पुरवठ्यावर देखरेख व तुटवडा होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी या दोघांवर राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

काय आहे रेमडेसिव्हिर…

अलीकडे चर्चेत आलेले हे औषध नेमके काय आहे याबद्दल आता सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांना विचारणा केली असता त्यांनी कोविड 19 च्या गंभीर  अर्थात 9 पेक्षा जास्त स्कोअर्स असणारे, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन वापरण्यात येते. अनेक डॉक्टर्स कोरोना रुग्णांवरील उपचारात  हे औषध प्रभावशाली असल्याचे मानतात असे त्यांनी स्पष्ट केले.