रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (मकसूद शेख ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेशनचा तांदूळ काळ्या बाजार विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना वाहनांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्ह्याच्या सीमेवर करणवाडी (ता. जळगाव जामोद) येथे 31 मे रोजी करण्यात आली होती. या प्रकरणी तहसीलदारांनी अहवाल दिल्यानंतर काल, 9 जूनला वाहनचालक व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.काँ. …
 

जळगाव जामोद (मकसूद शेख ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रेशनचा तांदूळ काळ्या बाजार विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना वाहनांसह पोलिसांनी ताब्‍यात घेतले. ही कारवाई जिल्ह्याच्‍या सीमेवर करणवाडी (ता. जळगाव जामोद) येथे 31 मे रोजी करण्यात आली होती. या प्रकरणी तहसीलदारांनी अहवाल दिल्यानंतर काल, 9 जूनला वाहनचालक व त्‍याच्‍या सोबत असलेल्या व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पो.काँ. किरण वानखेडे हे तीन सहकाऱ्यांसह जिल्हा सीमेवर करणवाडी येथे तैनात होते. 31 मे रोजी दुपारी तीनच्‍या सुमारास त्‍यांना पिंपळगाव काळे गावाकडून बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक एमएच 18 एए 5936) येताना दिसली. पोलिसांनी ती थांबविली. चालक रामेश्वर गोविंद वानखडे (39, वर्ष रा. आंबेडकर शाळेजवळ जळगाव जामोद) व मनोहरसिंह गेंदासिंह राजपूत (47, रा. बाहेरीलपुरा जळगाव जामोद) यांना वाहनातील तांदूळ कुणाचा आहे, असे विचारणा पोलिसांनी केली. मनोहरसिंहने हा माल आपलाच असल्याचे सांगितले. त्‍याला मालाची पावती आहे का, असे विचारले असता त्याने पावती नसल्याचे सांगून उडवा उडवीची उत्तरे दिली. हा तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणाली अंतर्गत वितरित होणारा असल्याचा संशय आल्याने वाहनासह तो जळगाव जामोद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. तशी माहिती सहायक पोलीस निरिक्षक सतिश आडे यांना देण्यात आली.

तहसीलदारांना कळवल्यानंतर निरीक्षण अधिकारी पी. टी. वराडे यांनी तांदूळाची पाहणी करून मनोहरसिंहचा जबाब घेतला. एकूण 48 पोतड्यांतील (अंदाजे 24 क्विंटल, किंमत 35000 रुपये) हा तांदुळ सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणाली अंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या तांदूळासारखा असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले. प्रयोगशाळेतील तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले. अहवाल प्राप्‍त झाल्‍यांनतर तांदूळ रेशनचाच असल्याचे समोर आल्याने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मनोहरसिंह व रामेश्वर वानखडे या दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. 35 हजार रुपयांचा तांदूळ व बोलेरो पिकअप वाहन (किंमत 3 लाख) जप्‍त करण्यात आले.