रोखठोक : बुलडाणेकर पालकांनो, हे लक्षात घ्या अन्यथा आयुष्यभर पश्चातापाची वेळ येईल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही महिन्यांत बुलडाणा जिल्ह्यातून अल्पवयीन मुली आणि तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. हे वयच असं असतं, जे हळवं असतं आणि तातडीने कुणावर विश्वास टाकून मोकळं होतं. संभाव्य धोक्यांची पुसटशी कल्पनाही त्यांना नसते. प्रेमाच्या स्वप्नांत रमताना चुकीचे पाऊलही पडते आणि घरचे कधीच स्वीकारणार नाही याची कल्पना करून नंतर …
 
रोखठोक : बुलडाणेकर पालकांनो, हे लक्षात घ्या अन्यथा आयुष्यभर पश्चातापाची वेळ येईल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही महिन्यांत बुलडाणा जिल्ह्यातून अल्पवयीन मुली आणि तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्‍या वाढले आहे. हे वयच असं असतं, जे हळवं असतं आणि तातडीने कुणावर विश्वास टाकून मोकळं होतं. संभाव्‍य धोक्‍यांची पुसटशी कल्‍पनाही त्‍यांना नसते. प्रेमाच्‍या स्वप्‍नांत रमताना चुकीचे पाऊलही पडते आणि घरचे कधीच स्वीकारणार नाही याची कल्पना करून नंतर पलायनासारखे प्रकार घडतात. चालू ऑगस्‍ट महिन्यात १ तारखेपासून आजच्‍या २९ तारखेपर्यंत १६ ते २५ या वयोगटातील तब्‍बल २६ मुली, तरुणी गायब झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून परत आणलेली नांद्रा कोळीची १६ वर्षीय मुलगी चक्‍क ६ महिन्यांची गर्भवती निघाली आणि तिला पळवून नेणारा चक्‍क दोन लेकरांचा बाप निघाला. हे प्रकार जिल्ह्यात का वाढले आहेत, मुली-तरुणी इतक्‍या बेभान का झाल्यात, यात खरंच केवळ त्‍यांचीच चूक आहे का?.. अर्थातच नाही. यात सर्वांत मोठे दोषी आहेत ते पालक! आपली मुलगी मोबाइलवर काय करते, कुणाशी बोलते, कुठे जाते, तिचे मित्र आणि मैत्रिणी कोण, मित्राशी तिचा संवाद संशयास्पद आहे का, हे बघण्याची जबाबदारी पालकांची असते. अतिविश्वास किंवा त्‍यांची कामकाजातील व्यस्‍तताच त्‍यांना नडते. याचा अर्थ प्रत्‍येक पालकाने आपल्या मुलीवर अविश्वास दाखवावा. संशयाच्‍या नजरेने पाहावे असे नाही. पण किमान काळजी घेणे गरजेचे असते. विश्वास असावा पण सोबत काळजी असावी… पण अतिविश्वास ठेवून पालक स्वतःच्‍या पायावर कुऱ्हाड मारून घेत असल्याचे अनेक उदाहरणांतून बुलडाणा लाइव्हच्‍या समोर आले आहे.

कोणतीही गोष्ट एकाएकी घडत नसते. आज प्रेम झालं, उद्या पळून गेले असंही होत नसतं. यात भरपूर असा कालखंड जात असतो. पण त्‍या कालखंडातही पालकांना उमजत नसेल, ते भानावर येत नसतील आणि वेळीच काही गोष्टींना रोखत नसतील तर यात सर्वस्वी चूक त्‍यांचीच म्‍हणावी लागेल. कारण प्रेम आंधळं असतं. नांद्रा कोळीच्‍या घटनेमुळे दोन लेकरांच्‍या बापावरही ते होऊ शकतं. एखाद्या गुन्‍हेगारी वृत्तीच्‍या तरुणावरही होऊ शकतं. बुलडाण्यात तर हेरून मुलींना असे जाळ्यात अडकविल्याचे प्रकार समोर आले आहेत. स्‍मार्टफोन मुलीच्‍या हाती देताना त्‍यावरील धोक्‍यांची आणि बंधनांची जाणीव कोण करून देणार?, येणारा अनोळखी नंबर उचलू नये हे सांगण्याचीही तसदी पालक घेत नसतील तर याला दोषी कोण? तास तास भर मुलगी फोनवर बोलते, चॅटिंग करते, पण पालकांना याबद्दल गंभीर होण्यासारखे काही वाटत नाही.

चांगलंवाईट कळण्याचं ते वय नसतं, अशावेळी सज्ञान असणारे पालक अज्ञानी बनून का राहतात? बुलडाणा जिल्ह्यातील मुली बेपत्ता होण्याचे वाढते प्रकार चिंताजनक आहेत. पण बेपत्ता होणाऱ्या बहुतांश मुली, तरुणी प्रेमाच्या जाळ्यात फसूनच पळवल्या जातात, हेही यात लक्षात घेण्यासारखे आहे. काही दिवसांपूर्वी मेहकर तालुक्‍यातील एका शाळकरी मुलीचे अपहरण झाले. याबद्दलची बातमी बुलडाणा लाइव्हला आली. त्‍या बातमीत ती मुलगी या शाळेत शिकत होती, असा उल्लेख आल्याने शाळेच्‍या मुख्याध्यापिकेने आकाडतांडव केले. पण त्‍यांना आपल्या शाळेतील मुलींबद्दल काही सूचना पालकांना कराव्याशा का वाटल्या नाहीत, हाही प्रश्नच आहे. शाळांची जबाबदारी फक्‍त विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरतीच आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो. सध्या ऑनलाइन क्‍लासेस घेतले जातात. या क्‍लासेसच्या माध्यमातूनही अनेक गैरप्रकार घडत असल्याचे जिल्ह्यात समोर आले आहेत. अशा वेळी शाळा व्यवस्‍थापनाने पालकांना काही सूचना करणे गरजेचे असते. पण शुल्‍कवसुलीसाठी तगादा लावण्यापलिकडे शाळांना आणखी किती जबाबदारीही आपल्यावर आहे याचे भान नसते.

पालकांनी काय करायला हवे…

  • आपले पाल्य (मुलगा असो की मुलगी) कुणाशी बोलत राहते यावर कटाक्षाने लक्ष हवे.
  • हेरून जाळ्यात अडकविण्याचे प्रकार बुलडाणा शहरात वाढले आहेत, याची जाणीव मुलींनाही देणे गरजेचे आहे.
  • अनोळखी नंबर न उचलणे कधीही फायद्याचे. कारण पाल्याकडे असणाऱ्या मोबाइलवर अनोळखी नंबर उचलण्याची तशीही गरज नसते.
  • मैत्रिणी कोण आहे, मित्र असेल तर त्‍याचा तिच्‍याशी संवाद कसा आहे हेही गांभीर्याने पाहिले पाहिजेत.