रोहणा, कंझारा, अंजत्र, हिवरखेड शिवारात पुन्‍हा भल्‍या पहाटे कोंबिंग ऑपरेशन… दोन अट्टल गुन्‍हेगारांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या; पिस्‍तूल, धारदार शस्‍त्रांचा साठा जप्‍त

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोन्याच्या गिन्न्या अर्ध्या किंमतीत देण्याचे आमिष दाखवून बोलवायचे आणि गिन्न्या न देता त्यांच्याकडील पैसे, ऐवज हिसकावून मारहाण करून पिटाळून लावायचे… वारंवार हे गुन्हे घडत असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक पोलिसांना अपयश येत होते… 5 मे रोजी पुण्याच्या एका व्यावसायिकाला अशाच पद्धतीने 15 लाख रुपयांनी लुटले …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  सोन्याच्‍या गिन्न्या अर्ध्या किंमतीत देण्याचे आमिष दाखवून बोलवायचे आणि गिन्न्या न देता त्‍यांच्‍याकडील पैसे, ऐवज हिसकावून मारहाण करून पिटाळून लावायचे… वारंवार हे गुन्‍हे घडत असताना गुन्‍हेगारांच्‍या मुसक्‍या आवळण्यात स्‍थानिक पोलिसांना अपयश येत होते… 5 मे रोजी पुण्याच्‍या एका व्‍यावसायिकाला अशाच पद्धतीने 15 लाख रुपयांनी लुटले गेले. त्‍याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली… वारंवार घडणाऱ्या या घटनांचा ‘सोक्षमोक्ष’ लावण्याचा निर्धार केलेल्या कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षकांनी दीडशे पोलिसांचा फौजफाटा घेऊन दुसऱ्याच दिवशी भल्‍या पहाटे पाचलाच अंत्रज फाटा (ता. खामगाव) शिवारात गुहेगारांच्‍या वस्‍तीवर हल्ला बोल केला होता. या ठिकाणी तब्‍बल 25 जणांना ताब्‍यात घेतले होते. आज या कारवाईचा दुसरा अंक पहायला मिळाला. अटकेतील गुन्‍हेगारांच्‍या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्‍या आधारे आज, 12 मे रोजी भल्‍या पहाटे पुन्‍हा रोहणा, कंझारा, अंजत्र, हिवरखेड येथे एकाचवेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यातून दोन अट्टल गुन्‍हेगारांच्‍या मुसक्‍या आवळण्यात यश आले असून, तब्‍बल 3 लाख 13 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. यात पिस्‍तूल, दागिने, धारदार शस्‍त्रांचा साठाच हाती लागला आहे.

दादाराव सीताराम पवार, जवाहरलाल दादाराव पवार (दोन्‍ही रा. अंत्रज) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्‍हेगारांची नावे आहेत. कोंबिंग ऑपरेशनचे नेतृत्त्व पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी केले. दोन अट्टल गुन्‍हेगारांना ताब्‍यात घेण्याबरोबरच इतर संशयितांच्‍या घराची झडती घेण्यात आली. त्‍यातून मोठे घबाड पोलिसांच्‍या हाती लागले. यात देशी बनावट पिस्‍तूल, 22 मोबाइल, 500 ग्रॅम पांढऱ्या धातूने दगिने, 300 ग्रॅम पिवळ्या धातूच्‍या गिन्न्या, 2 तलवारी, 3 भाले, 1 कुऱ्हाड, 2 मोठे लोखंडी सुरे, 11 लोखंडी सुऱ्या व चाकू, दांडा नसलेल्या 3 कुऱ्हाडी, 3 मोटारसायकली असा एकूण 3 लाख 13 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगाव शहरचे पोलीस निरिक्षक सुनील अंबुलकर, ग्रामीणचे पोलीस निरिक्षक रफीक शेख, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी, हिवरखेडचे ठाणेदार प्रवीण तळी, पिंपळगाव राजाचे ठाणेदार सचिन चव्‍हाण, सहायक पोलीस निरिक्षक द्वारकानाथ गोंदके, पोलीस उपनिरिक्षक जयपालसिंह ठाकूर, गौरव सराग, योगेश धोत्रे, सम्राट ब्राह्मणे, रणजितसिंह ठाकूर, ईश्वर सोळंके, चंद्रकांत बोरसे, रत्‍नदीप पळसपगार, संजय अवचिते, राहुल चव्हाण, हरीविजय बोबडे, नीलेश डाबेराव, भगवान राठोड नितीन इंगोले, महिला पोलीस उपनिरिक्षक श्रीमती गोसावी, 80 पोलीस अंमलदार आणि 2 आरसीपी पथकांनी केली.